ठाणे : 'कोकणी ग वस्ती' या माझ्या पहिल्या कथा संग्रहाला पु. ल. देशपांडे यांची पहिली प्रस्तावना लाभली आणि हे माझ्यासाठी शुभाशींवाद होते. ग. दि. माडगूळकर यांच्या लेखनाचा माझ्यावर प्रभाव होता. पुस्तके नुसती लिहून चालत नाही, तुम्ही ते चांगले लिहिता हे जाणकारांनी सांगावे लागते असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी काढले. आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद मनाचा या कार्यक्रमाचे 91 वे पुष्प मधु मंगेश कर्णिक यांनी गुंफले. कवयित्री, लेखिका प्रा. दीपा ठाणेकर यांनी त्यांची मुलखात घेतली. प्रा. प्रदीप ढवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कर्णिक पुढे म्हणाले, माझी प्रत्येक कादंबरी ही कधी एका विषयावर राहिलेली नाही. त्यामुळे मला फार प्रयत्न करावे लागले नाही. परंतु मी सक्षमपणे डोळे उघडे ठेवून समाजाचे निरीक्षण आपल्या मनात नोंदविले आणि लिहिण्याची कला मला प्राप्त असल्याने मी लिहितो. कादंबऱ्या, कथा, कविता अशा विविध साहित्य प्रकारांत मी जे लेखन केले त्यातून मी जीवनाचे दर्शन घेतले आणि घडविले. पण मी माझ्या जीवनाचे आणि पाहिलेल्या जीवनाचे कधी प्रदर्शन केले नाही. लेखन ही माझी ऊर्जा आहे, ते माझे प्राण आहे. ते माझ्यात जिवंत आहे म्हणून मी जिवंत आहे आणि आजही मी लिहितोय. माझ्या लिखाणाचे विषय वेगवेगळे असतात. 'भाकरी आणि फुल' या दलित साहित्याचा त्यांनी प्रवास उलगडला. ते म्हणाले, कोकणातील दलित समाजाची व्यथा मी यात मांडली. 1957-58 पासून मी दलित साहित्य लिहायला लागलो. दलित समाजाचे जीवन मी जवळून पाहिले आहे. तुम्ही काय पाहता, काय लिहिता ते लोकांपर्यंत पोहोचते की नाही याचे मोजमाप केले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. 'करूळचा मुलगा' या आत्मचरित्रामागची भूमिका मांडताना ते म्हणाले, या आत्मचरित्रात मी माझे साहित्यिक जीवन मांडले आहे. लेखकाला कसे सुचते याची व्याख्या करता येत नाही असे त्यांनी शेवटी सांगितले.
माझ्या पहिल्या पुस्तकाला पु. ल. देशपांडे यांची प्रस्तावना हे माझ्यासाठी शुभाशींवाद होते : मधु मंगेश कर्णिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 4:34 PM
मधु मंगेश कर्णिक यांनी मुलाखतीत आपला लेखन प्रवास उलगडला.
ठळक मुद्देमधु मंगेश कर्णिक यांची मुलाखतपु. ल. देशपांडे यांची प्रस्तावना हे माझ्यासाठी शुभाशींवाद होते : मधु मंगेश कर्णिकमधु मंगेश कर्णिक यांनी उलगडला त्यांचा लेखन प्रवास