कल्याण : शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनने जागतिक महिला दिनानिमित्त ‘माय हिमोग्लोबीन डायरी’ हा पथदर्शी आरोग्यदायी उपक्रम महिलांसाठी सुरू केला आहे. संस्थेने त्यासाठी २५ महिलांना दत्तक घेतले आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थितीत आयएमएच्या सभागृहात सोमवारी या उपक्रमाची सुरुवात झाली. आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, ईशा पानसरे, सुरेखा इटकर, सोनाली पाटील, विशाखा परळीकर, प्रियांका धर्माधिकारी यांच्यासह अनेक महिला डॉक्टर यावेळी उपस्थित होत्या.
भारतीय महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना ॲनिमिया हा आजार होतो. हा आजार दूर करण्यासाठी ‘माय हिमोग्लोबीन डायरी’ हा उपक्रम सुरू केला आहे. आयएमएने त्यासाठी २५ गरजू महिलांची निवड केली असून, त्यांच्यावरील संपूर्ण उपचाराचा खर्च उचलला जाणार आहे. पुढील तीन महिने या महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण आवश्यक पातळीवर पोहोचत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. त्याचबरोबर महिला डॉक्टरांसाठी हाल-ए-दिल हा उपक्रम संस्था राबवत आहे. त्याद्वारे हृदयरोग तज्ज्ञांमार्फत महिला डॉक्टरांची संपूर्ण तपासणी केली जाणार आहे.
या निमित्ताने आयएमएने कोरोनाकाळात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शहर अभियंत्या सपना कोळी-देवनपल्ली, मनपा रुग्णालयातील डॉ. सुहासिनी बेडेकर, प्रज्ञा टिके, फोर्टीज रुग्णालयाच्या सुप्रिया अमेय यांचा गौरव करण्यात आला.
---------------