उल्हासनगर : महापालिका पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील शाळांचे शिक्षक यांना पर्यावरण दुत म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली.
उल्हासनगर महापालिका पर्यावरण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शहर स्वच्छ, सुंदर व प्रदुषणमुक्त व्हावे, यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी दिली. महापालिका महासभा सभागृहामध्ये शुक्रवारी महापालिका शाळांतील शिक्षक प्रतिनिधी यांचेकरीता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. प्रशिक्षणानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील विविध कृतीमधुन पर्यावरणाविषयी जनजागृतीचे धडे देणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पालक, पालकांमार्फत त्यांचे आप्तेष्ट शेजारी आदींना जनजागृती होण्यास मदत होणार आहे. असे आयुक्त अजीज शेख म्हणाले. शिक्षक हे पर्यावरण दुत म्हणून महत्वाचा घटक असुन प्रशिक्षण कार्यक्रमा नंतर ३७ शिक्षकांना पर्यावरण दूत म्हणून घोषित करुन प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे.
पर्यावरण प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉ. सिमा कांबळे, प्राचार्य डी.डी. विपुते आदींनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन पर्यावरण विभागामार्फत इन्फिनिटी रिलेशन्स या संस्थेमार्फत करण्यात आले होते. तथापि, सदर कार्यक्रमासाठी पर्यावरण विभागप्रमुख विशाखा सावंत, जनसंपर्क अधिकारी, छाया डांगळे आदीजन उपस्थित होत्या.