लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यात म्युकरमोयकोसिस या आजाराचे रुग्ण दिवासगणिक वाढू लागले आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणा या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज आहे. मागील काही दिवसांत दुपटीने रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात या आजाराचे १२६ रुग्ण आढळले असून, त्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार करण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिला आहे. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नसून ज्यांना कोरोनाच्या उपचारादरम्यान स्टेरॉइड जास्त प्रमाणात दिले असतील किंवा ज्यांना मधुमेहाचा त्रास असेल अशांनाच या आजाराची बाधा होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टांरांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना आता म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२६ जणांना या आजाराची बाधा झाली असून, त्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिकेबरोबर जिल्हा रुग्णालयाची प्रत्येकी एक-एक टीम या आजाराच्या रुग्णांसाठी सज्ज केली आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. या आजाराबाबत आजही नागरिकांमध्ये काहीसा संभ्रम आहे. परंतु हा आजार संपर्कातून होत नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ज्या कोरोनाबाधित रुग्णांवर जास्त प्रमाणात स्टेरॉइडचा वापर झाला असेल, ज्यांनी जास्त दिवस आयसीयूमध्ये उपचार घेतले असतील, ज्यांना मधुमेहाचा त्रास असेल अशांनाच म्युकरमायकोसिस आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते. कोरोनातून बरे झाल्यानंतरही जास्त प्रमाणात वाफ घेणे अयोग्य असून, त्यामुळे नाकात जखम होऊनही या आजाराची बाधा होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर नाकाची तपासणी करून घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. ठाण्यातील एका खासगी रुग्णालयाने त्यादृष्टिकोणातून पावले उचलली आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयाची पायरी न चढण्याची इच्छा रुग्णाची असते. त्यामुळेच नाकाची तपासणी करूनच घरी जावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
प्राथमिक लक्षणे
नाकातून पाणी येणे, सर्दी होणे, नाक दुखणे, नाकावाटे रक्त येणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. डोळ्यांची नजर हलणे, समोरचे दोन दोन दिसणे, डोळ्याची हालचाल थांबणे, डोळ्यांना सूज येणे, हे या आजाराचे दुसरे महत्त्वाचे लक्षण आहे. त्यानंतर हा आजार डोळ्यांवाटे थेट मेंदूत जातो. डोळा आणि मेंदूच्या मध्ये एक अतिशय पातळ स्तर असतो. तेथून हा म्युकर थेट मेंदूत जाऊन अटॅक करतो. त्यामुळे डोके सतत दुखणे हे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे.
ही घ्या काळजी
हा आजार रोखण्यासाठी सर्वात प्रामुख्याने गंभीर कोरोना रुग्णाने नाकाची तपासणी करूनच घरी जावे. गरम पाण्याची वाय अजिबात घेऊ नये, मिठाच्या पाण्याद्वारे नोजल वॉश करणे, धुतलेल्या रुमालाचा वापर करणे, एसीची नियमित सर्व्हिसिंग करणे, मास्क प्रत्येकी वेळी नवीन वापरणे, त्यातही सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी मधुमेह नियंत्रित करणे गरजेचे आहे. सर्वांत मोठा धोका अशाच रुग्णांना असल्याचे दिसून आले आहे. कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये किंवा ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यांनादेखील विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
म्युकरमायकोसिस या आजाराचे मागील काही दिवसांत रुग्ण वेगाने वाढत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे १२६ रुग्ण आढळले असून, त्यातील दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यातील तीन रुग्णांना मुंबईला हलविण्यात आले आहे. यातील बहुसंख्य रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात सात जणांची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच न्युरोसजर्नही उपलब्ध करून घेतला जाणार आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यासाठी १५ खांटाचा एक वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या आजाराचा मुकाबला करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांसाठी ८३ जणांचा स्टाफ कंत्राटी स्वरूपात घेतला जाणार आहे.
डॉक्टर काय म्हणतात
संसर्गातून हा आजार पसरत नाही. ज्या कोरोनाबाधित रुग्णांवर आयसीयूत जास्त दिवस उपचार झाले असतील, ज्या रुग्णांना स्टेरॉइड जास्त प्रमाणात दिले असतील किंवा ज्यांना मधुमेह असेल अशा रुग्णांना याचा धोका संभावतो. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर नाकाची चाचणी करून घेऊन मगच रुग्णाने घरी जावे. म्युकरची कोणतीही प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत. पहिल्याच टप्प्यात या आजाराची लक्षणे दिसून आली आणि त्याकडे दुर्लक्ष केले गेले नाही, तर या आजारावर लवकर उपचार होऊन रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.
डॉ. प्रदीप उप्पल, कान, नाक, घसा तज्ज्ञ
कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळे रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरविणारी जी वाहिनी असते, ती वारंवार स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. घरी जाण्यापूर्वी रुग्णाने नाकाची तपासणी करणे गरजेचे आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत गरम पाण्याची वाफ शक्यतो टाळावी. नाक सतत स्वच्छ पाण्याने धुवावे, त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी सर्वांत जास्त काळजी घ्यावी.
डॉ. संतोष कदम - अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे
औषधांचा मुबलक साठा
शासकीय रुग्णालयात रुग्णावर मोफत औषधोपचार केले जात आहेत. त्यासाठी लागणारा औषधसाठा ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पुरेसा असल्याची माहिती देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेनेदेखील या औषधांचा साठा उपलब्ध करून घेण्यासाठी निविदा काढली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी भूलतज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ आदींची सात जणांची टीम सज्ज करण्यात आली आहे. चार ते पाच दंत चिकित्सकदेखील उपलब्ध आहेत. बाहेरूनदेखील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम घेतली जाणार असून, न्युरोसजर्नही उपलब्ध करून घेतला जाणार आहे.
डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे