ठाणे: कळव्यातील शांतीनगर परिसरातील मेहरुम मिसा (५९) या महिलेच्या मृत्यु प्रकरणी संशयित आरोपीवर कारवाईसाठी स्थानिक रहिवाशांनी सोमवारी सकाळी कळवा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. दरम्यान, याप्रकरणी सखोल चौकशी सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी सांगितले.शुक्रवारी १९ जानेवारी २०१८ रोजी पहाटेच्या सुमारास मेहरुम हिचा मृतदेह तिच्या शांतीनगरातील घरात मिळाला होता. याच परिसरात राहणारा ओंकार पवार हा संशयास्पदरित्या तिच्या घराबाहेर घुटमळतांना सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळल्यामुळे कळवा पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतू, या महिलेच्या शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये तिचा संशयास्पद मृत्यु किंवा खूनाबाबत काहीही आढळले नाही. तसेच पवार विरुद्ध आणखी काही तथ्यता न आढळल्यामुळे पोलिसांनी चौकशीनंतर त्याला सोडले. परंतू, केवळ सीसीटीव्ही फूटेजमध्ये तो आढळल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी त्याच्यावर संशय व्यक्त करीत त्याच्या अटकेसाठी कळवा पोलीस ठाण्यावर सोमवारी मोर्चा काढला होता. संबंधित संशयित आरोपीवर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच मृत महिलेला न्याय मिळावा, अशा मागणीचे निवेदन शांतीनगरच्या रहिवाशांनी कळवा पोलिसांना दिले.याप्रकरणी महिलेच्या अकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल आहे. वैद्यकीय अहवालात कुठेही तिला मारल्याच्या किंवा तिच्या खूनाबाबतच्या खाणाखुना नाहीत. संशयिताची चौकशी करण्यात आली. पण प्राथमिक चौकशीत तरी तथ्यता न आढळल्यामुळे त्याला सोडून देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले. पवार पहाटे २ वाजण्याच्या सुमारास तिच्या घराजवळ आढळला असला तरी तत्पूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल आहे. या प्रकरणात सर्वच बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
‘‘ प्रथम दर्शनी तरी या महिलेचा खून झाल्याचे आढळलेले नाही. त्यासंबंधी महिलेच्या नातेवाईकांनाही तशी कल्पना दिली आहे. डॉक्टरांनी मृत्युचे स्पष्ट मत अद्याप दिलेले नाही. सीसीटीव्हीमध्ये संशयित आरोपी आढळला असल्याने त्यादृष्टीनेही चौकशी सुरु आहे.’’डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर