लाेकमत न्यूज नेटवर्कशेणवा : शहापूर तालुक्यातील वेहळोली खुर्द (निमसे) गावाला मंगळवारी दुपारी पुन्हा तीन वेळा हादरे बसले. दुपारनंतर ४.३० आणि ५.५० वाजता बसलेले हादरे इतके तीव्र होते की, गावातील काही घरांवरील कौले व भांडी खाली पडली. या धक्क्याने किन्हवलीत गुरुकुलनगर परिसरातही इमारती हादरल्या.
मागच्या आठवड्यात मंगळवारी (दि. २२) किन्हवली जवळील वेहळोली गावासह मोहीपाडा, चिखलगाव या गावांतील जमीन हादरली होती. पुन्हा २९ नाेव्हेंबरला वेहळोली गावाला तीनदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. दुपारनंतर साडेचार वाजता बसलेल्या धक्क्याने काही घरांवरील कौले, भांडी पडल्याचे वृत्त आहे. ५.५० मिनिटांनी सर्वांत मोठा धक्का जाणवला. चिखलगावसह किन्हवलीतील गुरुकुलनगर भागातही इमारतींना धक्का जाणवला आहे. जमिनीतून मोठा आवाज येतो व त्यानंतर धक्के बसत असल्याची माहिती ग्रामस्थ सुनील निमसे, संदीप देसले यांनी दिली. या गावाच्या उत्तरेकडे लघुपाटबंधारे प्रकल्प असल्याने परिसराला धोका वाढला आहे.
भातसानगर येथील भूकंपमापन यंत्रणेकडून वेहळोली येथील भूकंपाची तीव्रता समजेल. जिल्हाधिकाऱ्यांना लेखी व दूरध्वनीवर तातडीने माहिती दिली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.- नीलिमा सूर्यवंशी, तहसीलदार, शहापूर
भातसा धरण येथील भूकंप यंत्रणा नादुरुस्त आहे. मंगळवारी २२ नोव्हेंबरला बसलेल्या हादऱ्यांबाबत हैदराबाद येथील नॅशनल फिजिक रिसर्च सेंटरला कळविण्यात आले आहे.- योगेश पाटील, भातसा प्रकल्प, कार्यकारी अभियंता
कशामुळे नेमके धक्के?
वेहळोली परिसरात कुठेही खदाणी किंवा तत्सम खोदकाम, सुरुंगस्फोट हाेत नसताना तीव्र धक्के बसत असल्याने गूढ वाढले आहे. या घटनेबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असल्याचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी सांगितले.