डोंबिवली : बेपत्ता झालेल्या सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह घराजवळील एका बांधकामाच्या ठिकाणी ड्रेनेजच्या टाकीत शुक्रवारी आढळला होता. या मुलाच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. महापौर विनीता राणे यांनी रविवारी मुलाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाचे सांत्वन केले. दरम्यान, जेथे मुलाचा मृत्यू झाला, त्या बांधकामाच्या चौकशीचे आदेशही राणे यांनी बेकायदा बांधकामविरोधी विभागाला दिले आहेत.पूर्वेतील देसलेपाडा परिसरातील चाळीत राहणारा मुलगा गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास खेळताना अचानक बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, त्याचा कोठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर, याची माहिती त्यांनी स्थानिक मानपाडा पोलिसांना दिली. रात्रभर चाळीतील रहिवाशांची शोध मोहीम सुरू होती. शुक्रवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान नजीकच्या बांधकामाच्या ठिकाणी ड्रेनेजच्या टाकीतील पाण्यात मुलाचा मृतदेह आढळला. बांधकाम करणाऱ्या विकासकाच्या हलगर्जीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.दरम्यान, केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे उघड झाल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. पण, हा अहवाल न मिळाल्याने या घटनेमागील गूढ कायम आहे.महापौर विनीता राणे यांनी रविवारी मुलाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे हे देखील उपस्थित होते. मुलाचा मृतदेह जेथे आढळला, त्या जागेचीही महापौरांनी पाहणी केली. तेथे सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नव्हत्या. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून त्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. बांधकाम करणाºया विकासकाने परवानगी घेतली आहे का? याची चौकशी करावी, असे आदेश त्यांनी बेकायदा बांधकामविरोधी विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांना दिले.
मुलाच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम, महापौरांकडून कुटुंबाचे सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:10 AM