विशाल हळदे
ठाणे - एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत श्री माँ विद्यालय, ठाणे व हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात श्री माँ विद्यालयाच्या अद्विक मंडलिक याने 5 गडी बाद केल्यामुळे त्याच्या या कामगिरीच्या जोरावर श्री माँ विद्यालयाने 8.1 षटकांत 9 गडी राखून हा सामना जिंकला.
हिरानंदानी फाऊंडेशन स्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. या संघाने 20 षटकांत सर्व गडी बाद फक्त 37 धावा केल्या. यात श्री माँ विद्यालयाच्या अद्विक मंडलिक (5-3-5-5) याच्यासह ईशान तावडे (5-2-10-1), अथर्व सुर्वे (5-2-7-1) आणि रुग्वेद जाधव (4-2-10-3) या गोलंदाजानीही चांगली कामगिरी केली.
हा सामना जिंकण्यासाठी श्री माँ विद्यालयापुढे फक्त 38 धावांचे लक्ष्य होते. अभिनंदन चव्हाण याने 16 धावा आणि रुजुल रांजणे याने 15 धावा केल्या. 1 गड्याच्या मोबदल्यात 8.1 षटकांमध्ये 38 धावा करून श्री माँ विद्यालयाने हा सामना जिंकला.
ठाणे जिल्ह्यातील आंतरशालेय विद्यार्थांसाठी गेली 47 वर्षे खेळवली जाणारी स्टार स्पोर्टस् क्लब आयोजित आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल येथे सुरू आहे.