मुरबाड : दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री सडक योजनेतून नारिवली येथील पर्यटन क्षेत्राकडे जाण्यासाठी नढई ते नारिवली या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. यासाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल सहा कोटी खर्च करण्यात आले. सध्याच्या घडीला या रस्त्याची चाळण झाली आहे. रात्रंदिवस सुरू असलेल्या खासगी कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे ही वाताहत झाली आहे.
म्हाडस येथील बेकायदा स्टोनक्रशर खाणीतून एका खासगी कंपनीचे खडीने भरलेले शेकडो अवजड डम्पर या रस्त्याने जातात. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक हाेत असल्यामुळे रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे लहान वाहने, मोटार सायकलस्वारांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून एसटी महामंडळाच्या बसही जात आहेत. हा रस्ता अरुंद असल्याने येथे नेहमीच छोटे-मोठे अपघात होतात. खराब रस्त्यामुळे याठिकाणी खासगी प्रवासी वाहतूकही सुरू नसते. त्यामुळे नागरिकांना अनेकदा पायपीट करावी लागते. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष न दिल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा प्रवासी आणि नागरिकांनी दिला आहे.
काेट
नढई-नारिवली रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरबाड यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
- स्नेहा धनगर, उपसभापती, पंचायत समिती, मुरबाड
रस्त्यासंबंधी संबंधित कंपनी व्यवस्थापन व स्टोनक्रशरमालक यांच्याशी वारंवार चर्चा करूनही थातुरमातुर काम करून खड्डे भरले जातात. डम्परची वाहतूक होत असल्याने रस्ता खराब होत आहे. जर लवकरात लवकर हा रस्ता चांगला केला नाही, तर लोकांना आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.
- सुरेश बांगर, माजी सरपंच, भुवन