जितेंद्र कालेकर
ठाणे : ठाण्यातील नगमा नूर मकसूदअली ऊर्फ सनम खान (रा. लोकमान्यनगर, ठाणे) ही तीन वर्षांपासून पाकिस्तानी हॉटेल व्यावसायिक बशीर अहमद (वय २७) याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्याच्याशी तिने ऑनलाइन निकाह केला होता. नगमाचा पहिला विवाह झाला आहे. तिला त्या नवऱ्यापासून दोन मुली आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार केल्यामुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेली नगमा हिला सुटका झाल्यानंतर दोन्ही मुलींना घेऊन पाकिस्तानात जायचे आहे, अशी माहिती तिने ठाणे पोलिसांना चौकशीत दिल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
नगमा ही महिला पाकिस्तानवारीमुळे ठाण्याच्या लोकमान्यनगर भागात चर्चेत आहे. नगमाचे उत्तर प्रदेशातील हसन अन्सारी याच्याबरोबर २०१२ मध्ये पहिले लग्न झाले. त्याच्यापासून तिला ११ वर्षांची आयेशा आणि आठ वर्षांची निशा या मुली आहेत. हसन कामधंदा करीत नसल्यामुळे त्यांच्यात वाद व्हायचे. २०१६ मध्ये तिने त्याच्याशी काडीमोड घेतला. लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून नगमाची पाकिस्तानमधील हॉटेल व्यावसायिक असलेल्या एका तरुणाशी २०२१ मध्ये ओळख झाली. नगमासोबत राहणाऱ्या तिच्या आईने नाव दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये ते एकमेकांना भेटले. तिच्या लग्नाला दोन्ही कुटुंबांनी संमती दिली. मे २०२४ मध्ये त्यांनी ऑनलाइन निकाह केला.
वर्तकनगर पोलिसांच्या माहितीनुसार, लग्नानंतर तिने नावात बदल करून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच मुलीचा बनावट जन्मदाखला आणि आधार कार्ड एका दुकानातून तयार केले. त्याच कागदपत्रांच्या आधारे तिने पासपोर्ट मिळविला. त्याआधारे पाकिस्तानचा व्हिसा प्राप्त करून पाकिस्तानवारी केली. या काळात तिने पाकिस्तानात नोंदणी पद्धतीने विवाह केला.