डोंबिवली : नागपुरातील ८१ पैकी ३४ मराठी शाळा बंद पडल्याचे शपथपत्र नागपूर महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केले आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने ‘मराठीचे स्वयंसेवक व्हा’, अशी हाक दिली होती. राज्यभरातून त्याला प्रतिसाद मिळत आहे. यासंदर्भात १० मे नंतर एक बैठक नागपुरात होणार आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी दिली आहे.मराठी भाषा वाचवण्यासाठी सरकारने केवळ धोरण जाहीर केले आहे. मात्र, त्यासाठी कृतीशील कार्यक्रम आणि सहभाग हवा. त्याच्या अंमलबजावणीची इच्छाशक्ती हवी, असा मुद्दा जोशी यांनी मांडला आहे. मराठी वाचवण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहता कामा नये. त्यामुळे मराठी शाळा वाचवण्यासाठी स्वयंसेवक होण्याचे आवाहन जोशी यांनी केले होते. ‘लोकमत’मध्ये त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर, जोशी यांच्याकडे अनेकांनी मोबाइलवरून विचारणा केली. तसेच मराठी शाळा वाचवण्याचा हा प्रयत्न आणि त्यासाठी केलेले आवाहन हे उचितच आहे, असा दुजोरा दिला.याबाबत न्यायालयात याचिका दाखल केलेल्या संस्थांचे शिक्षक, पदाधिकारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर यांची बैठक १० मे नंतर घेतली जाईल. त्यात मराठी शाळा वाचवण्यासाठी विचारविनिमय केला जाणार आहे, असेही डॉ. जोशी म्हणाले.
मराठी शाळांसंदर्भात नागपुरात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 2:01 AM