ठाणे : नायच तहसीलदार राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४८०० रूपये करण्याचे अनुषंगाने यापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही करून ही मागणी मान्य करावी, अन्यथा राज्यभरातील नायब तहसीलदार बेमुदत संपावर जावून तीव्र आंदोलन छेडणार आहे, असा इशारा महसूल मंत्र्यांना देण्यात आला, असे येथील महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी लाेकमतला सांगितले.
नायब तहसीलदार यांच्या या ग्रेडपेसाठी या आधी करण्यात आलेल्या बेमुदत कामबंद आंदाेलनाची दखल घेउन शासनाने सकारात्मक निर्णय घेतला. मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यास अनुसरून हा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावे, अन्यथा पुन्हा तीव्र बेमुदत आंदाेलन करण्याचा इशारा महसूल मंत्री यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला असून त्यास अनुसरून तयारी सुरू झाली, असे पैठणकर यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी मान्यता दिल्यानंतर सुद्धा आजपर्यंत या ग्रेड पे वाढीचा शासन निर्णय जारी करण्यात आला नाही?. त्यामुळे राज्यभरातील नायब तहसीलदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. असंतोष निर्माण झाला आहे. त्याची दखल घेण्यात यावी, अन्यथा बेमुदत संप पुकारून ग्रेड पे वाढवून घेण्यासाठी तीव्र आंदोलन पुन्हा सरु करण्याचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचही पैठणकर यांनी स्पष्ठ केले.