कल्याण : झाडांना ही संवेदना असतात. तेही सजीव आहेत. पण फक्त त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे ते व्यक्त होऊ शकत नाहीत. परंतु, त्यांच्या वेदना आम्हाला ऐकू येत आहेत. त्यामुळेच त्यांच्या वेदना कमी करण्याचा आमचा हट्टाहास आहे, असे सांगत ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेच्या मुंबई टीमने झाडांवरील खिळे काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या टीमने बिर्ला महाविद्यालय ते खडकपाडा सर्कल परिसरात हा उपक्रम राबवला.पुण्यातील तरुण माधव पाटील यांनी झाडांवरील खिळे काढण्यास सुरुवात केली. ‘अंघोळीची गोळी’ने त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच हा उपक्रम दादर परिसरात १ एप्रिलपासून हाती घेतला. त्या वेळी शिवाजी पार्क परिसरातील झाडांचे खिळे काढण्यात आले. आमचा हा प्रयोग आजच्या पुरता मर्यादित नाही. मुंबईतील विविध भागांत तरुणांनी व नागरिकांनी एकत्रित अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत, असे आवाहान या टीमने केले आहे.साधारणपणे ३० युवकांनी दोन तासांत ६० पेक्षा अधिक झाडे खिळेमुक्त केली. ठाणे, मुंबई परिसरात या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे.पाणीबचतीचा संदेश‘अंघोळीची गोळी’ ही संस्था मुंबईत पाणी बचतीचा संदेश देत आहे. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत या चार तत्वांवर ‘अंघोळीची गोळी’ उभारलेली आहे. पाणी वाचवण्याचे ध्येय उराशी बाळगून ही संस्था शाळा, महाविद्यालये तसेच खेडोपाडी जाऊन पाण्याचे महत्त्व पटवून देते.
खिळे काढल्याने झाडांच्या वेदना झाल्या कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 3:08 AM