ठाणे : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी विविध जिल्ह्यातील शहर अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या निवडी केल्या होत्या. त्यानंतर आता प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस पदाच्या नियुक्त्या देखील मंगळवारी केल्या आहेत. यामध्ये प्रमोद हिंदुराव यांची उपाध्यक्षपदी तसेच ठाण्यातील शहराध्यक्षपदाच्या रेसमधील एकाची प्रदेश सरचिटणीसपदी तर दुसऱ्याची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती केली आहे. नजर चुकीने पक्षात नसलेल्या एका सदस्याचीसुद्धा याच पदासाठी नियुक्ती केली होती. परंतु ती चूक दुरुस्त करून त्या जागी मुंब्य्रातील सय्यद अली अशरफ यांची नियुक्ती केली आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्टÑवादीने जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये ठाणे, नवी मुंबईतील, भिवंडीतील अनेकांना थेट प्रदेशवर काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे.नव्या नियुक्त्यांमध्ये ठाण्यातील नजीब मुल्ला यांची प्रदेश सरचिटणीसपदी नेमणूक केली आहे. तर सलग दोन ते तीन वेळा ठाणे शहर अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या सुहास देसाई यांची देखील प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती केली आहे. एकूणच देसाई यांचा या निमित्ताने काटा काढल्याची चर्चा आहे. सुरुवातीपासून ते शहर अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. आतासुद्धा त्यांनी थेट श्रेष्ठींकडे एका बड्या नेत्याच्या माध्यमातून शहराध्यक्षपदासाठी जोर लावला होता. त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्यामुळेच त्यांची नाराजी दूर करून थेट प्रदेशवारी करण्याची संधी देऊन पक्षाने त्यांच्यावर मेहरनजर दाखविल्याची चर्चा सुरू आहे.
नजीब मुल्ला राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:39 AM