डहाणू : डहाणू तालुक्यात कोरोना काळात बांधकामासह इतर सर्व प्रकारचे व्यवसाय बंद पडल्याने, नाक्यानाक्यावर कामासाठी उभ्या राहणाऱ्या मजुरांना मागणी नसल्याने शेकडो नाका मजुरांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. कोरोना संसर्गामुळे गेल्या सात महिन्यांपासून या मजुरांच्या हाताला काम नाही. शिवाय सरकारच्या विविध विभागामार्फत होत असलेली रोजगार हमीची कामे देखील होत नसल्याने आदिवासी भागात मनरेगाच्या कामाची मागणी होत आहे.डहाणू तालुक्यातील डहाणू, वाणगाव, चिंचणी, चारोटी अशा ठिकाणच्या बाजारपेठांच्या नाक्यावर, बेरोजगार तरुण कामाच्या शोधात जमा होत असतात. तेथून गरजू मालक त्यांना मालवाहक मोटारीवर हमाली, बांधकाम बिगारी, रेती, खडी, मुरूम मातीच्या ट्रकवर हमाली, आदी कामासाठी त्यांना नेत असतात, मात्र कोरोना संसर्गामुळे, बाजारपेठेत मंदी आल्याने ही कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नाका मजुरांच्या हाताला काम नसल्याने या मजुरांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. डहाणू वाणगाव रेल्वेस्थानक आणि बस स्थानकात, शेकडो नाका मजूर येऊन दररोज कामासाठी उभे राहत असतात. तेथून ते प्लंबिंग, रंगारी, सफाई कामगार, लाकूड कटाई, भात कापणे, गवत कापणी, मासेमारी, फर्निचर, वीटभट्टी, अशा विविध कामासाठी जात असतात.शहरांतही जाता येत नसल्याने चिंताकोरोना प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वेसेवा बंद आहे. यामुळे या मजुरांना शहरांत रोजगारासाठी जाता येत नाही. त्यामुळे त्यांना घरी परतावे लागत असून त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.डहाणूत केंद्र सरकारने २० जून १९९१ च्या अधिसूचनेनुसार, कोणताही उद्योग उभारण्यास बंदी घातलेली असल्याने आम्हाला कायमस्वरूपी काम मिळत नाही, त्यामुळे आम्हाला काम मिळवण्यासाठी शहराच्या ठिकाणी जाऊन नाक्यावर उभे राहावे लागते, पण मंदीमुळे कामाला कोणी बोलवत नसल्याने घरी परतावे लागत आहे.- कृष्णा पटारा, मजूर
डहाणूतील नाका मजुरांवर रोजगाराअभावी उपासमारीची पाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 1:26 AM