- सचिन सागरेकल्याण : जीएसटी तसेच अन्य काही कारणांमुळे आधीच उपासमारीची वेळ आली असताना आता ‘कोरोना’ नावाचे संकट आमच्या पुढ्यात येऊन उभे राहिल्याने दुष्काळात तेरावा ‘कोरोना’ म्हणण्याची वेळ नाका कामगारांवर आली आहे. कामेच मिळत नसल्याने त्यांच्यावर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.घराची दुरुस्ती, इमारतींचे बांधकाम यासारख्या कामांसाठी नाका कामगारांची आवश्यकता असते. कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, खडकपाडा, म्हसोबा चौक, नाना पावशे चौक, तिसगावनाका, शहाड तसेच डोंबिवली रेल्वेस्थानक, पाटकर रोड, टाटा पॉवर, कोळेगाव अशा नाक्यांवर सुमारे २५ ते ३० हजारांच्यावर नाका कामगार रोज सकाळी कामासाठी उभे असतात. आधीच जीएसटी तसेच ग्रामीण भागातील कामे बंद झाल्याने या कामगारांवर उपासमारीचे संकट आले असतानाच कोरोनामुळे तर त्यांना कामच मिळायचे बंद झाले आहे. इमारतींच्या कामांसह घरातील कामे ७० टक्के बंद झाली आहेत. तसेच, जी कामे सुरू होणार आहेत, ती कोरोनामुळे सुरूच झाली नाहीत. त्यामुळे, नाका कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. महिन्यातून सुमारे १५ हजार रुपये मिळायचे; मात्र आता सात हजार रुपयांवरच त्यांना घरखर्च भागवावा लागत असल्याचे महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांनी सांगितले. नाका कामगारांवर उपासमार होत असून काही दिवसांपासून त्यांना काम मिळत नसल्याचे सत्यशोधक कामगार संघटनेचे सचिव संजय जाधव यांनी सांगितले.कोरोनामुळे कल्याणमधील नाका कामगारांची संख्या कमी झाली नाही. हातावर पोट असल्याने त्यांना काम सध्या मिळत नसल्याने उपासमारी होत आहे.- प्रशांत माळी, अध्यक्ष, असंघटित कामगार कल्याणकारी संस्था
नाका कामगार हाताला काम मिळत नसल्याने झाले हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 1:40 AM