कल्याण : मान्सूनपूर्व सरींनी सोमवारी कल्याण-डोंबिवलीत अर्धा तास हजेरी लावली. पावसाच्या नुसत्या हजेरीने केडीएमसी हद्दीतील नालेसफाईची पोलखोल केली असून ही कामे योग्य प्रकारे झाली नसल्याच्या विरोधकांच्या आरोपावर शिक्कामोर्तब झाले. काठावर ठेवलेला कचरा पुन्हा नाल्यात गेल्याने खर्च पाण्यात गेला. काही दुकाने आणि घरांमध्ये आणि महापालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले होते. यामुळे संतप्त झालेले शिवसेनेचे कल्याण विधानसभा क्षेत्र संघटक आणि माजी नगरसेवक अरविंद मोरे यांनी महापालिकेच्या विरोधात चिखलफेक आंदोलनाचा इशारा देऊ न सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे.
नालेसफाईच्या कामांसाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत. मात्र, अर्धा तास पडलेल्या पावसामुळे कल्याण-डोंबिवलीत ठिकठिकाणी पाणी साचले. शिवाजी चौक, भूमिगत गटार ओव्हरफ्लो झाल्याने महापालिका मुख्यालय परिसरात पाणी भरले. तसेच कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील रमाबाई आंबेडकरनगरमध्ये सात घरात पाणी शिरले. या ठिकाणी एका बिल्डरने चुकीच्या पद्धतीने केलेल्या बांधकामामुळे नाल्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याची तक्रार नागरिकांची आहे. दुपारपर्यंत या घरांमध्ये पावसाचे पाणी तसेच साचून होते. कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरातील चिकणीपाडातील हरिश्चंद्र यादव आणि उदय गायकवाड यांच्या चाळीत पाणी शिरले होते.रामबाग, शिवाजी चौक, बाजारपेठ, नारायण पेठ, ओक बाग, आंबेडकरनगर, सुभाष मैदान, कामगार वसाहत याठिकाणी पहिल्याच पावसात पाणी साचले. तसेच कल्याण परिसरात पहिल्या पावसात उच्च दाबाची वीजवाहिनी असलेल्या नऊ पोल व कमी दाबाची वीजवाहिनी असलेले सात वीजखांब कोसळले. एका डीपीचेही नुकसान झाले असून कल्याणच्या काही परिसरात बत्ती गुल झाली होती.महापालिका नालेसफाईचे काम देते; मात्र कंत्राटदार हे काम योग्य प्रकारे करतो की नाही यावर महापालिकेचे काहीच नियंत्रण नसते. कंत्राटदाराला पाठीशी घालणाºया अधिकाºयांना निलंबित न केल्यास चिखलफेक आंदोलन केले जाईल, असा इशारा आयुक्तांना मोरे यांनी दिला आहे.गाळ पुन्हा नाल्यातकोपर रेल्वे स्थानकाजवळील नाल्यात कचरा, गाळ व प्लास्टीक पिशव्यांचा खच पडलेला असतो. तो स्वच्छ केला जात नसल्याच्या निषेधार्थ मनसेने कोपर नाल्यास ‘महापौर नाला’ असे नाव दिले होते. मनसेच्या या आंदोलनानंतर महापालिकेने तो साफ केला.मात्र, नाल्यातून काढलेला कचरा, गाळ व प्लास्टीकचा खच नाल्याच्या शेजारीच रचून ठेवला होता. सोमवारी झालेल्या पावसात नाल्यातून काढलेला कचरा, गाळ, प्लास्टीकचा खच पुन्हा नाल्यात गेला आहे, याकडे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी लक्ष वेधले आहे.टिटवाळा परिसरात पावसाची हजेरीटिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग, टिटवाळा शहरात मंगळवारीही पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.३० वाजल्यानंतर वाºयासह पाऊस बरसला. यावेळी बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा आनंद लुटला.टिटवाळा परिसरात सोमवारी सायंकाळी पाऊस झाला. त्यामुळे मंगळवारी वातावरणात उष्मा जाणवत होता. दुपारी ३ च्या सुमारास आभाळ भरून आले आणि सर्वत्र आंधार पसरला. सोसाट्याच्या वाºयासह पावसाला सुरुवात झाली.तासाभर बरसल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यात मुलांनी भिजत धम्माल केली. पावसाच्या हजेरीमुळे बळीराजा सुखावला आहे. पाऊस असाच रोज पडला तर येत्या आठवड्यात भातशेतीच्या पेरणीला सुरुवात होईल, असे फळेगाव येथील शेतकरी कृष्णा जाधव यांनी सांगितले.