मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिकेने केलेल्या नालेसफाईचा पहिल्याच पावसाने बोजवारा उडवला आहे. शहरात जागोजागी पाणी साचले. त्यातही सांडपाणी वर आल्याने घाण पाण्यातून मार्ग काढावा लागला. नालेसफाईसह शहरात वारेमाप भराव आणि अतिक्रमणांना महापालिका व लोकप्रतिनिधींनी दिलेला आशीर्वादही पाणी तुंबण्यास पुन्हा कारण ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.रात्रीपासून पाऊस सातत्याने पडत नसला तरी पहिल्याच पावसाने पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली. शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. त्यातच अनेक भागात सांडपाणी तुंबल्याने सखल भागातील घरे व दुकानात शिरून आत दुर्गंधी पसरली. साचलेल्या सांडपाण्यातूनच चालत नागरिकांना वाट काढावी लागली. यामुळे आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे.पहिल्याच पावसात भाईंदर पश्चिमेला बेकरी गल्ली, सुदामानगर, राई, मुर्धा आदी भागात पाणी साचले होते. भार्इंदर पूर्व परिसर तर जलमय झाला होता. पूर्वेच्या जेसलपार्क, बाळाराम पाटील मार्ग, महात्मा फुले मार्ग (केबीन रोड), खारीगाव, तलाव रोड, गोडदेव आदी भागात मोठ्या प्रमाणात सांडपाणी आणि पावसाचे पाणी साचले होते. मीरा रोडच्या कनकिया, शांतीनगर, नयानगर, विजयपार्क, आरएनए ब्रॉडवे, संघवी टॉवर, सुंदर सरोवर, मुन्शी कंपाऊंड आदी अनेक परिसरात पाणी साचले. अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. काही भागात पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावले होते. सबवेमध्ये पाणी भरले होते.पालिकेने नालेसफाईसाठी यंदा जवळपास अडीच ते पावणेतीन कोटी रुपयांचा खर्च केला होता. या शिवाय गेल्या काही वर्षांपासून शहरातील कांदळवन, सीआरझेड, नाविकास क्षेत्र, पाणथळ, मीठागर क्षेत्रात लोकप्रतिनिधी व पालिकेच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात भराव टाकून बेकायदा बांधकामे झाली आहेत. यामुळे पावसात वा भरतीच्या वेळी पाणी साचून ठेवण्याची क्षमता असणारी ही क्षेत्रे झपाट्याने नष्ट केली जात आहेत. शहरातील खाड्यांमध्येही अतिक्रमण व बांधकामे होऊन पात्र नामशेष होत चालली आहेत. यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.दुष्काळाचे सावट दूरमुरबाड : पावसाअभावी मुरबाड तालुक्यावर दुष्काळाचे सावट पसरले होते. अखेर दमदार पावसाने हजेरी लावली आणि मुरबाडकर सुखावून गेले. शेतात बियाणांची धूळपेर करून पाऊस पडत नसल्याने बोअरवेलचे पाणी शिंपडणाऱ्या शेतकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला. या पावसाने पिकाला मोठा दिलासा मिळाला असून शेतातही पाणी साचले आहे. काही प्रमाणात झरेही वाहू लागले आहेत.अनेक रस्ते पाण्याखाली : किन्हवली : चेरपोली ग्रामपंचायत हद्दीतील राहुलनगर येथे पहिल्याच पावसात पूरसदृश्य परिस्थिती तयार झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत महिला व विद्यार्थी यांना चक्क रस्ता शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पहिल्याच पावसात चेरपोली ग्रामपंचायतीचा भोंगळ काभार चव्हाट्यावर आला आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या अर्धवट कामामुळे रस्त्यावर पाणी साठून आजूबाजूच्या बिल्डिंगसमोर पाणी साठले असून अनेक तळमजल्यावर पाणी आले होते.घरामध्ये जाण्यासाठीही पाण्यातून जावे लागले. याचा त्रास सकाळी जाणाºया मुलांना व महिलांना सोसावा लागला. राहुलनगरमधील मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून पावसाळ््यात तर नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.भिवंडीत जोरदार सुरूवातभिवंडी : गुरूवार रात्र आणि शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. आग्रा रोडवरील कमला कणेरी, कमला हॉटेल, नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती, शिवाजीनगर भाजीमार्केट,नझराना कंम्पाऊंड अशा सखल भागात पाणी साचल्यामुळे व्यापारी व नागरिकांचे हाल झाले. देवजीनगर व टावरे कंम्पाऊंड येथे झाड पडल्याच्या घटना घडल्या तसेच शहरातील संगमपाडा येथील महापालिका कर्मचारी वसाहतीच्या कम्पाऊंडची भिंत कोसळली. तसेच रावजीनगर व शांतीनगर भागात घराच्या भिंती कोसळल्या. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याणरोड, अंजूरफाटा, रांजनोली चौक,वंजारपाटीनाका, नारपोली व शेलार अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. तर मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडी झाली होती. पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वीजप्रवाह खंडित झाला होता. पावसाच्या आगमनाने शेतीच्या कामास सुरूवात झाली आहे.बळीराजा सुखावलाखर्डी : पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. जून महिना संपत आला तरी पावासाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत पडला होता. पेरण्या लांबल्या होत्या. दरम्यान काही दिवसापूर्वी तुरळक पडलेल्या पावसात शेतक-यांनी पेरलेला धान्याचा पेरा वाया जातो की काय अशी धास्ती शेतकºयांमध्ये पसरली होती. पाऊस चांगला झाल्यामुळे विभागातील विहिरी भरून गेल्याने येथील पाण्याची चिंता मिटली आहे.
नालेसफाई ठरली फोल : पहिल्याच पावसात मीरा-भार्इंदर तुंबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 1:03 AM