ठाणे : नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी सुरू होत असतात. परंतु, पावसाळ्यात ती झाली नाही, म्हणून महासभेत नेहमी ओरड होत असते. त्यामुळे आता दरमहिन्याला नालेसफाई करता येऊ शकते का ? याची चाचपणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी संबंधित विभागाला दिले. असे झाले तर पावसाळ्यात नाले तुंबण्याचे प्रमाण कमी होऊन नगरसेवकांच्या तक्रारींनाही आळा बसेल, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत ११७ किलोमीटर अंतराचे एकूण ३०६ नाले आहेत. मुंब्य्रात ३१ किलोमीटर लांबीचे ९२ नाले आहेत. कळव्यात ९ किलोमीटरचे ४७, रायलादेवीमध्ये १७ किलोमीटरचे ३७, वर्तकनगरमध्ये १९ किलोमीटर लांबीचे २५, मानपाडा १७ किलोमीटरचे २६, नौपाडा येथे साडेचार किलोमीटरचे २४, वागळे इस्टेटमध्ये ८ किलोमीटरचे २०, उथळसरमध्ये साडेसात किलोमीटरचे २४ आणि कोपरीत ४ किलोमीटर लांबीचे ११ नाले आहेत. शहरातील सांडपाणी वाहून नेणारे हे नाले पावसाळ्यात तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर महापालिका वर्षातून एकदा त्यांची सफाई करते. परंतु पावसाळा सुरू झाला तरी ती सुरूच असते. त्यामुळे याचे पडसाद महासभेतदेखील वारंवार उमटतात. अशा घटना टाळण्यासाठी यापूर्वी वर्षातून दोनदा नालेसफाई करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही महापालिकेने सुरू केली होती. मात्र, काही वर्षांत ही पद्धत बाद करून वर्षातून एकदाच नालेसफाईची पद्धत पुन्हा सुरू झाली. परंतु, पावसाळ्यापूर्वी घाईघाईने ती केली जात असल्यामुळे शहरात नाले तुंबण्याचे प्रकार घडत आहेत.
....
यासंदर्भात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यानुसार प्रत्येक महिन्याला नालेसफाई करता येऊ शकते का, याची चाचपणी करून त्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानंतर नालेसफाई दरमहा करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.