- अजित मांडके, ठाणेपहिला पाऊस झाला आणि ठाणेकरांची पुन्हा एकदा तारांबळ उडाली. त्यातही या पहिल्याच पावसाने ठाणे महापालिकेच्या कामांची पोलखोलही झाली. नाल्यांची सफाई झाली असल्याचा दावा पालिकेने केला असला तरी पहिल्या पावसाने नालेसफाई नेमकी कशी झाली होती, याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. वर्तकनगर, चिखलवाडी आदींसह शहरातील इतर भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना घडल्या होत्या. आता ही घटना घडून गेल्यानंतर पालिका जागी झाली असून आम्ही २४ तास तत्पर असल्याचे सांगत आहे. त्यात दरवर्षीप्रमाणे नालेसफाईचे होणारे भांडवल यंदाही झाल्याचे दिसले. कॉंग्रेसने याविरोधात आंदोलन करून यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. पूर्वीपेक्षा यंदा नालेसफाईच्या कामांचा निधी २ कोटींनी पालिकेने कमी केला आहे. परंतु काही वर्षांपूर्वी नालेसफाईची कामे काही लाखांत होत असताना आता मात्र त्यासाठी १० कोटींच्यावर निधी लागतोच कसा अशी चर्चा होत आहे.ठाण्यात नालेसफाईच्या कामाला आचारसंहितेचा फटका बसेल असे वाटत होते. निर्धारित वेळेत नालेसफाईच्या कामांना सुरूवात झाली. यावेळी ५२ कंत्राटदारांच्या माध्यमातून शहरात एकाचवेळी नालेसफाई करण्याचे काम सुरू झाले. गेल्यावर्षी नालेसफाईसाठी १० कोटींचे असलेले बजेट यावर्षी २ कोटींनी कमी करण्यात आला. झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात असल्याने नाल्यात जाणारा सुमारे ३० टक्के कचरा कमी झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे हे बजेट कमी केल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. घरोघरी जाऊन जवळपास ५० ते ६० टन कचरा रोज जमा होत असून झोपडपट्टी भागातील २ लाख घरांमधून हा कचरा गोळा केला जात असल्याची माहिती घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे नालेसफाईचा खर्च हा ८ कोटींवर आला असल्याचा दावा पालिकेनेच केला आहे. ठाण्यात पहिल्यांदाच जर्मनीच्या तंत्रज्ञानाने युक्त अशा रोबोट मशीनचा वापरही यंदा नालेसफाईच्या कामात करण्यात आला आहे. हा रोबोट ३६० अँगलने फिरत असल्याने कठीण नाल्यामध्येही स्वच्छता करताना या मशीनचा चांगला उपयोग होत असल्याचा दावा घनकचरा विभागाने केला आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच नालेसफाईसाठी ६२ झोन तयार केले आहे. जीपीएस प्रणाली तसेच कॅमेराचा वॉच यावर्षीही ठेवण्यात आला आहे. नालेसफाईनंतरही नाल्यामध्ये कचरा असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी सफाईचे चित्रीकरण करण्यात येत आहे.दरवर्षी पालिकेची अशीच तयारी असते, यंदा त्यात केवळ रोबोटीक मशीनची भर पडली एवढेच काय ते समाधान मानावे लागणार आहे. नाल्यातून गाळ काढल्यानंतर तो सुकल्यावर उचलला जाणार होता. परंतु पहिला पाऊस झाला आणि हा गाळही अनेकांच्या घरात शिरल्याचे दिसून आले. अवघ्या एका तासाच्या पावसाने नालेसफाईच्या कामांची पोलखोल करुन टाकली. वर्तकनगर येथे अनेकांच्या घरात पाणी शिरले. चिखलवाडी भागातही अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. काही नाले ओव्हरफ्लो झाले तर गटारांमधून पाण्याला वाट काढणे अवघड झाले होते. त्यामुळे पालिकेच्या या कारभाराचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला आहे. कॉंग्रेसने तर या नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत एक दिवसाचे उपोषण केले. त्यातून काही साध्य होणार आहे का? तर याचे उत्तर नाही असे म्हणावे लागणार आहे.दरवर्षी पहिला पाऊस झाला की नालेसफाईच्या कामांची बोंब सुरु होत असते. प्रत्येकवर्षी त्यानंतर होणाऱ्या महासभेत विरोधक आणि सत्ताधारी आक्रमक होतात, या कामाची तपासणी करा, चौकशी करा ठेकेदाराची बिले थांबवा अशांसह भ्रष्टाचाराचा आरोपही केला जातो. यंदाही तसाच आरोप झाला असून या विरोधात महासभेतही आवाज उठवला जाणार हेही निश्चित मानले जात आहे. परंतु त्यातून हाती काहीच येणार नाही, हे राजकीय मंडळींनासुध्दा माहित आहे. मूळात शहरातील नाल्यांची लांबी, रुंदी आणि काही नाल्यांचा प्रवाह बदलण्यात आला आहे. काही नाले हे राजकीय मंडळींच्या सांगण्यावरुन तर काही नाल्यांचे प्रवाह हे प्रशासनाच्या अॅडजेस्टमेन्टमुळे बदलले आहेत. त्यामुळे अशा नाल्यातील पाणी हे रस्त्यावर आणि घरात शिरते. याला जबाबदार कोण असा सवालही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.दुसरीकडे नालेसफाई करतांना नाल्यातील गाळ हा १०० टक्के काढला जातो अथवा नाही, याची खात्री पालिकासुध्दा देऊ शकत नाही. काही ठिकाणी पहिल्या पावसाची वाट बघितली जात असून हा पाऊस झाल्यावर नाल्यातील गाळ निघून जातो असाही काहीसा समज ठेकेदारांचा झाला आहे. त्यामुळे वरवर सफाई करायची आणि बिले मात्र १०० टक्के घ्यायची असाच काहीसा हा प्रकार आहे.नालेसफाईवर एवढा खर्च होतो का?यापूर्वी शहरातील नालेसफाईसाठी ४० लाख ते १ कोटींचा खर्च केला जात होता. परंतु कालातंराने काही नवीन नाले झाले, नाल्यांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे हा खर्च काही प्रमाणात वाढू शकत होता. परंतु आताच्या खर्चाचा विचार केला तर हा खर्च कैकपटीने वाढल्याचे दिसते. त्यामुळे खरच एवढा खर्च नालेसफाईवर होतो का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या खर्चावरच आता आक्षेप घेतला जात आहे. आयुक्त यामध्ये लक्ष घालतील का?, अशी अपेक्षा आता समस्त ठाणेकर व्यक्त करीत आहेत.
पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:55 PM