ठाणे : पावसाळा तोंडावर आलेला असताना घाईघाईत नालेसफाईचे काम पूर्ण करताना ठाण्यातील ठेकेदाराने थेट नालेसफाईच्या कामासाठी बालमजूरांना जुंपल्याचा आरोप मनसेने केला आहे. या मुजोर ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे. अशा पध्दतीने मिरा - भाईंदर महापालिकेच्या हद्दीत नालेसफाई करता बालमजूर राबविणाऱ्या ठेकेदाराला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातदेखील ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी मनसेने केली आहे.
लहान मुलांच्या खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांना नालेसफाईच्या कामाला ठाण्यातील सतीश प्रधान महाविद्यालयामागील नाल्यात ठेकेदाराने जुंपले. कोणतीही सुरक्षेची साधने न पुरवता या लहान मुलांना नाल्यातील गाळ उपसण्यास ठेकेदाराने भाग पाडले. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली आहे. याबाबत ठाणे पालिका व पोलिस प्रशासनाला पाचंगे यांनी पञ दिले असून अत्यंत धोकादायक अशा जीवघेण्या नालेसफाईच्या गर्तेत लोटणार्या या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, असेही पाचंगे यांनी पञात नमूद केले आहे. दरम्यान, मीरा - भाईंदरमध्ये नालेसफाईच्या कामात बालमजूराना जुंपणार्या ठेकेदाराला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात ठेकेदाराला चांगलाच दणका देण्यात आला आहे. या धर्तीवर ठाण्यात कारवाई झाल्यास इतर ठेकेदारांवर जरब बसेल, असे पाचंगे यांनी सांगितले.
स्वच्छता निरिक्षक, सहाय्यक आयुक्तांवरही कारवाई व्हावीनालेसफाईच्या कामादरम्यान कंत्राटदारांनी करारनाम्यातील अटी शर्तीचे भंग करून बाल मजूर कामाला जुंपल्याने आता संबंधित स्वच्छता निरिक्षक, सहाय्यक आयुक्तांवरही कारवाई व्हावी, असे पाचंगे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.