उल्हासनगर : गणेशोत्सव साजरा करताना बहुतांश गणेश मंडळांनी साधीच सजावट केल्याचे चित्र शहरात असले, तरी उत्साहात थोडीही कमतरता जाणवत नाही. गणेश मंडळे व नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत असून, बाप्पांच्या ऑनलाइन दर्शनाची सुविधा नावालाच आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
उल्हासनगरात मोठ्या धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जात असून, देखावे व सजावट दरवर्षी एकापेक्षा एक सरस असतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे. यावर्षी कोरोनाची बंधने शिथिल झाल्याने गणेश मंडळे व भक्तांत उत्साह संचारला आहे. मात्र, देखावा व सजावट करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार काही मोठ्या गणेश मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली असली, तरी अशा मंडळांची संख्या अगदी अल्प आहे. गणेश दर्शनासाठी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी मंडळांनी स्वयंसेवक तैनात केले असून, मंडळाबाहेर प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनंतर पावसाची संततधार असल्याने, नागरिक बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणावे तसे बाहेर पडले नाहीत. मात्र, दोन दिवसांत नागरिक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता आहे.
शहरातील गणेश मंडळांनी नियमावली तयार केली असून, भक्तांनी रांगेत उभे राहून विशिष्ट अंतर ठेवून दर्शन घेणे, कोणताही प्रसाद न चढवणे, मंडळाबाहेर ठेवलेल्या सॅनिटायझरचा उपयोग करणे व मास्क घालणे बंधनकारक केले आहे. शहरात कुठेही गणेश मंडळांमध्ये देखावा व सजावटीसाठी चढाओढ नाही. बहुतांश मंडळे कोरोना नियम पाळण्याचा प्रयत्न करीत असले, तरी उत्साहाच्या भरात सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. अनेक मंडळांनी कोरोनावर देखावा करून यापासून सुटका करण्याचे साकडे बाप्पाकडे घातले आहे. संभाजी चौक, विठ्ठलवाडी स्टेशन येथील गणपती, कॅम्प नं-५ येथील गणेश मंडळ, संतोषनगर, कॅम्प नं-३ संत कंवाराम पुतळ्याजवळील गणेश मंडळ, कॅम्प नं-४ मुख्य मार्केटमधील उल्हासनगरचा राजा, आदी मंडळाने सामाजिक देखावे केले आहेत.
.............
महापालिका व पोलिसांची करडी नजर
महापालिका प्रशासन व शहर पोलिसांची गणेश मंडळांवर करडी नजर आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन होऊ नये, म्हणून महापालिका आयुक्त व पोलीस उपायुक्त यांनी गणेश मंडळ पदाधिकारी, समाजसेवक, राजकीय नेते यांची बैठक घेऊन खबरदारी घेण्याचे सुचविले आहे. यावर्षी नदी, तलाव, आदी ठिकाणी बाप्पांचे विसर्जन करण्यास महापालिकेने मनाई केली असून, विविध ठिकाणी महापालिकेने मूर्ती संकलन केंद्र उघडले आहे.