मुरबाड : शासन दरबारी वास्तव्याचा पुरावा म्हणून आवश्यक असलेले तसेच गोरगरिबांना स्वस्त धान्य पुरवठ्यासाठी लागणारे दस्तावेज म्हणून रेशनकार्ड लागते. परंतु, जांभुर्डे येथील दुकानदार मृत लोकांच्या रेशन कार्डावर धान्य उचलत असल्याचे समोर आले. त्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन चौधर यांनी ‘लोकमत’ला दिली.
मुरबाड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाकडून रेशनकार्डासंदर्भात कामे केली जातात. नवीन रेशनकार्डे बनवताना अनेक प्रकारची कागदपत्रे तसेच चौकशी अहवाल पाहिले जातात. परंतु, मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावातील मृत आदिवासी व्यक्ती हेमाडे गंगूबाई महादू रेशनकार्ड क्र. २७२००१८१५८३३, वडेकर कमा देवजी रेशनकार्ड क्र. २७२००१८५८४५, कोकाटे रामा चिमा रेशनकार्ड क्र. २७२००१८१६३६६, यंदे पोसू रामचंद्र रेशनकार्ड क्र. २७२००१८१६३८१, आणि याच गावातील मार्के बाबू कृष्णा रेशनकार्ड क्र. २७२००१८१६५६२ ही रेशनकार्डे दुकानदाराकडे अस्तित्वात असून त्यांचे धान्य दुकानदार उचलत असल्याची तक्र ार माजी सरपंच प्रकाश भोपी यांनी पुरवठा विभागाकडे केली. या कार्डावरील धान्य संबंधित दुकानदार उचलत असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या अन्न तसेच नागरी पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे दिसत आहे. प्रत्येक महिन्याचा प्रस्तुत मयत व्यक्तींच्या नावावरील धान्यसाठा शासकीय गोदामातून उचलल्याचे संकेतस्थळावर दिसते आहे. यामुळे तहसीलदार कार्यालयाने संबंधित दुकानदारावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला असता त्यांनी या दुकानदाराचा परवाना रद्द केला आहे.ग्रामस्थ प्रकाश भोपी व इतर नागरिकांनी दिलेल्या तक्र ारी नुसार पुरवठा विभागाने त्वरीत चौकशी केली असता त्या तक्रारीत संबंधित दुकानदार दोषी असल्याचे आढळले. त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यासाठी तहसीलदारांच्या मार्फत वरिष्ठाकडे अहवाल सादर करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली.- बी.सी. जाधव, पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार, मुरबाड