मीरा रोड : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने सोशल मीडियावर खोटी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामुळे संताप व्यक्त होत असून समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू करीत ही क्लिप फॉरवर्ड करू नका, असे आवाहन केले आहे. शिवाय, शहीद कौस्तुभ यांच्या नावे निधी जमवण्याचे प्रकार समोर आले आहेत. कौस्तुभ यांच्या मामी वर्षा जाधव यांनी शहीद पत्नी व कुटुंबीयांना मनस्ताप होईल, असे काही करू नका, असे आवाहन केले आहे.सोशल मीडियावर दोन दिवसांपासून शहीद कौस्तुभ राणे यांच्या पत्नीचे मनोगत म्हणून सात मिनिटांची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तर, काही मेसेजमध्ये शहीद पत्नीचे काल्पनिक मनोगत व्हायरल झाले आहे. ही क्लिप खोटी आणि निंदाजनक असून त्यामुळे कौस्तुभ यांच्या पत्नीला मनस्ताप झालेला आहे, असे जाधव यांनी सांगितले.शहीद कौस्तुभ यांचे मावसभाऊ मिहीर हेदवकर यांनी आॅडिओ क्लिपप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. शिवाय, सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी या आॅडिओ क्लिपप्रकरणी तपास करीत आहेत. क्लिप बनावट तसेच शहीद कुटुंबीयांचा अपमान करणारी असल्याने ती कोणीही फॉरवर्ड करू नये.नागरिकांनी आपल्या जबाबदारीचे भान राखून शहीद व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान राखावा, असे आवाहन मीरा रोडचे पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी केले आहे. क्लिप तयार करणाऱ्यांचा शोध सुरू असून ती फॉरवर्ड करणाºयांवरही कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.निधी जमवण्यास सुरुवातकाही लोकांनी शहीदमेजर कौस्तुभ यांच्या नावे निधी जमवण्यास सुरु वात केली आहे. कौस्तुभ यांच्या कुटुंबीयांना मदत करायची आहे, असे सांगून ही मंडळी नागरिकांकडून पैसे जमवत आहेत. शहीद मेजर कौस्तुभ यांच्या हौतात्म्याचा गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न कृपया करू नये, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.कणकवलीत शहीद कौस्तुभ राणे यांना श्रद्धांजली वाहणारवयाच्या अवघ्या २८व्या वर्षी काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना देशासाठी वीरमरण पत्करलेल्या शहीद मेजर कौस्तुभ राणे या सिंधुदुर्गच्या वीरपुत्रास श्रद्धांजली वाहण्यासाठी राणे (महाराणा) समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्गच्या पुढाकाराने रविवारी कणकवली येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.रजपूत समाजामध्ये राज्यासाठी, देशासाठी बलिदान पत्करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. त्यामध्ये कौस्तुभ राणे यांनी हौताम्य पत्करून मराठा समाजाच्या लौकिकात भर घातली आहे.कौस्तुभ राणे हे मूळचे सडुरे गावचे सुपुत्र. राणे कुटुंब मीरा रोडच्या शीतलनगर येथील हिरल सागर इमारतीत राहतात. उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढा देताना ते शहीद झाले होते.
मेजर कौस्तुभ यांच्या पत्नीच्या नावे खोटी क्लिप व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 3:40 AM