सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: निर्वासितांसाठी संरक्षित असलेल्या शेतजमिनी खासगी व्यक्तीस ताब्यात घेता येत नसतानाही कल्याण तालुक्यातील हेदूटणे या गावातील १७३ एकर शेत जमिनीवर बिल्डरकडून ताबा घेतला जात असून सातबारामध्येही बदल करण्यात आला, असा आरोप संबधित शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या मनमानी अन्यायाच्या निषेधार्थ या गावातील २० वयोवृद्धांसह शेकडो शेतकरी २७ एप्रिलपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे ओबीसी नेते राजाराम पाटील यांच्यासह शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून कल्याणच्या हेदूटणे,, निळजे येथील शेतकरी त्यांच्या सर्व सुमारे १७६ एकर शेतजमीनीवर भातशेती करीत आहेत. स्वातंत्र्यानंतर ही जमीन शेतकऱ्यांसाठी संरक्षित केलेली असल्याने या जमिनीवर खासगी व्यक्ती मालकी हक्क सांगू शकत नाही. मात्र,बिल्डर्सने ही जमिन ताब्यात घेण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करुन आपले नाव सातबारावर नोंद करुन घेतले, असा आरोप ओबीसी नेते राजाराम पाटील, हेदुटणे गावविस्तार परिषदेचे अध्यक्ष जयेंद्र संते यांनी केला.
या शेतजमिनीची विक्री,खरेदी करणे कायदेशीर नसतानाही शेतकº्यांना कोणताही मोबदला न देता, आमची समती न घेता अलिबाग कॉरिडॉरसाठी या जमिनीमधून रस्ता बांधणे, या जमिनीच्या सातबारावर विकासकाचे नाव नोंदविणे, प्रधानमंत्री आवास योजना राबविणे आदी बेकायदेशीर प्रकार झाल्याचा आरोप केला जात आहे. या विरोधात अनेकदा शासन दरबारी धाव घेऊनही आजपर्यंत कारवाई झाली नाही. त्यामुळे संतापलेले शेतकरी राजश्री भंडारी, मोहन भंडारी, मेघा काळण, गीता संते, ललिता भंडारी, भावना भंडारी, महेंद्र तरे, गणेश पाटील, रामदास भंडारी आदींनी उपाेषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"