मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये मतांची लाचारी आणि राजकीय फायद्यासाठी महापालिकेच्या रस्ते , चौक , सार्वजनिक वस्तू आदींना नावे देताना ज्यांचा महाराष्ट्राच्या मातीशी संबंध नाही अश्यांची नावे देऊ नयेत अशी मागणी मराठी एकीकरण समितीने महापौर व आयुक्तांना केली आहे .
एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख , प्रदीप सामंत , सचिन घरत आदींच्या शिष्टमंडळाने महापौर ज्योत्सना हसनाळे व आयुक्त डॉ . विजय राठोड यांची गुरुवारी भेट घेतली . ह्या भेटीत हिंदी भाषिक भवन ला तीव्र विरोध कायम असल्याचे पुन्हा सांगत ते रद्द करण्याची मागणी केली .
शहरातील सर्व नामफलक हे मराठी भाषेतून असावे अशी स्पष्ट कायदेशीर तरतूद असूनही त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी . काही राजकारणी व नगरसेवक हे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कोणाचीही नावे शहरातील रस्ते , बेट , उद्याने - मैदाने , पालिका इमारती वा वास्तुंना देत आहेत . वास्तविक राष्ट्रपुरुष वगळता महाराष्ट्राच्या मातीशी संबंध नसणाऱ्यांची नावे देणे निंदनीय असून मराठी मातीतील थोर - मान्यवरांचा अवमान करण्याचा प्रकार आहे . हे अजिबात सहन केले जाणार नाही असे सांगत अशी दिलेली नावे वगळण्यात यावीत अशी मागणी समितीने केली आहे .
ह्या सर्व मुद्द्यां बाबत संयुक्त बैठक नगरपालिकेच्या अधिकारी व मराठी एकीकरण समिती सोबत लावावी अशी मागणी समितीने पुन्हा केली आहे . हिंदी भाषिक भवन सह अन्य मागण्यां बद्दल लवकरच एखादी संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन महापौरांनी दिल्याचे समितीचे अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले .