लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत ६६ लाख ३७ हजार २२७ मतदार आहेत. यातील आठ लाख १७ हजार ९७९ मतदारांची छायाचित्रे मतदारयादीत नाही. त्यामुळे छायाचित्र नसलेल्या या मतदारांची नावे ५ जुलैनंतर मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. त्यांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदानाचा हा हक्क गमावण्याची आफत ओढवून न घेता संबंधित मतदारांनी जवळच्या निवडणूक शाखेत तत्काळ छायाचित्र उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाने मतदारयादीत मतदारांचे छायाचित्र अनिवार्य केले आहे. यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कारवाई करण्याची भूमिका आता आयोगाने घेतली आहे. ५ जुलैनंतर छायाचित्र नसलेल्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कारवाई होण्याआधी संबंधितांनी तत्काळ स्वत:चे छायाचित्र जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यात वेळोवेळी छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्रे गोळा करून मतदार यादी अचूक केली आहे. त्यात भिवंडी, शहापूर विधानसभा मतदारसंघांसह शहरी भागातील काही मतदारसंघांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमानी यांनी स्पष्ट केले.
यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचा त्यांच्या पत्त्यावरील घरोघरी जाऊन शोधही घेतला आहे. जे मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले आहेत किंवा आढळून येत नाहीत, अशा मतदारांचे पंचनामे करून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख ८४ हजार ५८२ मतदारांचे पंचनामे त्यांच्या घरी जाऊन केले आहेत. यापैकी ४ जूनपर्यंत दोन लाख ४७ हजार ८०९ मतदारांचा व २० जूनला ३६ हजार ७७३ जणांचा पंचनामा होऊन त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याची कारवाई हाती घेतली आहे.
--------------