कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळपासून मतदानकेंद्रांवरमतदानासाठी मतदारांच्या रांगा पाहावयास मिळाल्या. प्रत्येक बुथवर मतदार आपले नाव मतदारयादीत आहे का, याचा शोध घेत होते. त्यासाठी छापील यादीऐवजी मोबाइल अॅप्स व ऑनलाइनद्वारे नावे शोधण्यास जास्त प्राधान्य दिले. या मतदारसंघात तीन लाख ४० हजार ३०९ मतदार आहेत. त्यापैकी एक हजार ६६६ मतदारांची नावे वगळली गेली. त्यामुळे त्यांना हक्क बजावता आला नाही.
कोळसेवाडी परिसरातील बुथवर मतदार त्यांची नावे शोधत होते. मात्र, यादीत नावे न सापडल्यास अनेक जण मोबाइल अॅप तसेच ऑनलाइनद्वारे नावे शोधताना दिसत होते. कोळसेवाडीतील गायत्री विद्यालय आणि नेतिवलीनाका येथील प्रबोधनकार ठाकरे महापालिका शाळेत मतदारांनी गर्दी केली होती. तेथे यादीतून नावे शोेधून मतदान केंद्र गाठण्यासाठी मतदारांची झुंबड उडाली होती. चिंचपाडा येथील मतदानकेंद्र टेकडी परिसरात असल्याने मतदानकेंद्र गाठताना मतदारांची भरउन्हात दमछाक झाली. टेकडीच्या पायथ्याशी दिव्यांग मतदारांना नेण्यासाठी रिक्षाची सोय होती. तसेच तेथे दिव्यांग मतदारांना नेआण करणारी केडीएमसीची बस फिरताना दिसली.पिसवली भागातील मतदारांनी आमच्या नावाच्या स्लिप राजकीय पक्षांकडून मिळाल्या नसल्याच्या तक्रारी केल्या. महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी मतदानाची स्लिप आली होती. मग, आता लोकसभा निवडणुकीच्या वेळी का आल्या नाहीत, असा सवाल केला. प्रत्यक्षात निवडणूक आयोगाकडून या स्लिप वाटल्या जातात. मात्र, त्यांच्याकडूनही त्यांचे वाटप झाले नाही. केवळ मतदान करा, मतदानाचा टक्का वाढवा, असे पोकळ आवाहन निवडणूक आयोगाने केले, असे काही मतदारांनी सांगितले.
नांदिवलीतील सुवर्णा देशमुख म्हणाल्या की, मला मतदानाची स्लिप राजकीय पक्षांकडून मिळाली. मात्र, माझ्या पतीच्या नावाची स्लिप मिळाली नाही. तर, नेतिवलीत राहणारे कैलास म्हात्रे म्हणाले की, माझा मुलगा विशाल याचे नाव डोंबिवलीतील आजदे येथील मतदारकेंद्राच्या यादीत आढळले. त्यामुळे मतदारयादीत घोळ झाल्याचे स्पष्ट होते.
शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी म्हणाले की, लोकग्राम संकुलातील उल्हास इमारतीत ५६ सदनिका असून, अडीच हजार मतदार असल्याची यादी दिली आहे. कृष्णा इमारतीत ३६ सदनिका आहेत. तेथे एक हजार ६०० मतदार राहत असल्याचे यादीत नमूद केले आहे. यावरून मतदारयाद्यांचे काम सदोष झाले, हेच उघड होत आहे.