डोंबिवली : आकाशात उंच भरारी घेणारी मेट्रो, ३० फुटांचा ५०० फुगे असलेला पतंग, एलईडी दिव्यांचा पतंग, तिरंगी मोठा गोलाकार पतंग, फुलपाखरे, विविध पक्षी असलेल्या पतंगांनी बुधवारी डोंबिवलीतील आकाशात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर पतंग उडवणे, काटाकाटी आदी स्पर्धांचा पतंगप्रेमींनी मनमुराद आनंद घेत एकमेकांना ‘तीळगूळ घ्या, गोडगोड बोला’, अशा मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
मकरसंक्रांतीनिमित्त डोंबिवलीतील भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि भाजप गुजरात आघाडी यांनी प्रथमच ‘नमो पतंग महोत्सव’ बुधवारी हभप सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथे भरवला होता. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी मुलांनी व त्यांच्या पालकांनी तसेच पतंगप्रेमींनी सकाळपासूनच हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
महोत्सवात मोफत पतंग आणि मांजा देण्यात येत असल्याने ते घेण्यासाठी बच्चे कंपनीची चांगली गर्दी झाली होती. तर, काहींनी महोत्सवात येतानाच लहानमोठ्या आकाराचे कागदी, प्लास्टिकचे पतंग, मांजा सोबत आणले होते. शिशूवर्गातील मुलांपासून अगदी मोठ्यांनाही येथे पतंग उडवण्याच्या, बदवण्याच्या आणि काटाकाटीच्या स्पर्धेचा आनंद लुटण्याचा मोह आवरता आला नाही. त्यात मुली-युवतीही मागे नसल्याचे पाहायला मिळाले. गुल झालेला पतंग पकडण्याची कसरतही येथे रंगली होती.
पतंगबाजीव्यतिरिक्त जादूचे प्रयोग, डीजे, मून वॉकर, विदूषकही सर्वांचे आकर्षण ठरले. विविध कार्यक्रमांनाही नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. केवळ डोंबिवलीच नाही तर, ठाणे जिल्ह्याचा-महाराष्ट्रातील हा भव्य पतंग महोत्सव ठरला असल्याचे चव्हाण म्हणाले. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ डोंबिवलीतील नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले. दरम्यान, या महोत्सवावेळी आमदार निरंजन डावखरे, केडीएमसीचे स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, नगरसेवक राजन आभाळे, संदीप पुराणिक, मुकुंद पेडणेकर, भाजपा डोंबिवली शहराध्यक्ष नंदू जोशी, सरचिटणीस शशिकांत कांबळे, राजन चौधरी, भाजप गुजराती आघाडीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुसरीकडे व्यावसायिक पतंगबाजांनी महाकाय आकाराचे पतंग उडविले. त्यात प्रामुख्याने ३० फुटांचा ५०० फुगे असलेला पतंग, रात्रीच्या अंधारात चकाकणारे एलईडी लाइट पतंग, मेट्रो ट्रेन पतंग असे वैशिष्ट्यपूर्ण पतंग आकाशात झेपावताना दिसले. हे पतंग बदवण्यासाठी डहाणूहून खास तज्ज्ञ, व्यावसायिक-पतंगप्रेमी आले होते. रिमोट कंट्रोलद्वारे पतंग उडविण्याचा थरारही येथे अनुभवायला मिळाला.