नंदू म्हात्रे यांची काँग्रेसच्या गटनेते पदावरून हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 01:20 AM2020-01-21T01:20:05+5:302020-01-21T01:20:24+5:30
काँग्रेसच्या नगरसेविका हर्षदा भोईर यांनी भाजपचे उमेदवार विकास म्हात्रे यांना मतदान केल्याप्रकरणी नंदू म्हात्रे यांची काँग्रेसच्या गटनेते पदावरून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हकालपट्टी केली आहे.
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेविका हर्षदा भोईर यांनी भाजपचे उमेदवार विकास म्हात्रे यांना मतदान केल्याप्रकरणी नंदू म्हात्रे यांची काँग्रेसच्या गटनेते पदावरून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हकालपट्टी केली आहे. आता गटनेतेपदी काँग्रेस नगरसेविका दर्शना शेलार यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीची घोषणा महापौर विनीता राणे यांनी सोमवारी महासभेत केली.
स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या हर्षदा भोईर यांनी भाजपचे उमेदवार विकास म्हात्रे यांना मतदान केले. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा पॅटर्न असल्याने पक्षाने गटनेते म्हात्रे यांना हर्षदा भोईर यांच्याकरिता पक्षादेश काढण्यास सांगितले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी त्यासाठी तशा सूचना नंदू म्हात्रे यांना दिल्या होत्या. मात्र, म्हात्रे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. प्रत्यक्षात निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत शिवसेनेचे गणेश कोट यांना हर्षदा भोईर यांनी मतदान न केल्याने भाजपचे विकास म्हात्रे हे विजयी झाले. त्यामुळे हर्षदा भोईर व नंदू म्हात्रे यांनी पक्षविरोधी कृत्य केल्याचा अहवाल पोटे यांनी थोरात यांना पाठविला होता. या अहवालाची दखल घेत थोरात यांनी नंदू म्हात्रे यांची महापालिकेतील पक्षाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नगरसेविका दर्शना शेलार यांची नियुक्ती केली आहे.
पोटे यांनी हर्षदा भोईर यांचे नगरसेवक पद्द रद्द करण्याची मागणी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे आताच्या कारवाईत नंदू म्हात्रे यांना फटका बसला आहे. तर, या पुढे हर्षदा भोईर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
सभागृह नेतेपदी पेणकर यांची निवड
महापालिकेच्या सभागृह नेतेपदी प्रकाश पेणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाकडून आलेल्या आदेशाचे पत्र महापौर राणे यांनी वाचून दाखवित पेणकर यांची नियुक्ती केल्याचे सोमवारच्या महासभेत जाहीर केले आहे. सध्या या पदावर शिवसेनेचे श्रेयस समेळ हे काम पाहत होते.