लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : भारतीय बॅडमिंटनच्या क्षितिजावर १९५० ते ७० या काळात एकच नाव तळपत होते, ते म्हणजे नंदू नाटेकर. त्या काळी त्यांनी आपल्या शैलीदार खेळाने बॅडमिंटनमध्ये भारताची ओळख निर्माण केली. देशाबाहेरील स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुरुष दुहेरीत व एकेरीत मिळून १२ वेळा, तर मिश्र दुहेरीत पाच वेळा त्यांनी अजिंक्यपद मिळवले. अलीकडे बॅडमिंटनमधील यशामुळे खेळाडूंना अफाट लोकप्रियता मिळू लागली असली तरी नाटेकर हे भारतीय बॅडमिंटनमधील पहिले सुपरस्टार होते असेच म्हणावे लागेल, अशा शब्दांत स्वाक्षरी संग्राहक सतीश चाफेकर यांनी नाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
नाटेकर यांचे बुधवारी पुण्यात निधन झाले. त्यानिमित्ताने चाफेकर यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. नाटेकर यांचा जन्म १२ मे १९३३ रोजी सांगली येथे झाला. १९५६ मध्ये भारतातर्फे खेळताना त्यांनी पहिले विदेशी बॅडमिंटन विजेतेपद मिळवले. आज बॅडमिंटन म्हटले की सध्याच्या पिढीसमोर नावे येतील ती सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, ज्वाला गट्टा, श्रीकांत किदंबी यांची. तर, थोडे आधीच्या पिढीला दीपंकर भट्टाचारजी, पुलेला गोपीचंद यांची नावे आठवतील. त्याही आधीच्यांना प्रकाश पदुकोण यांचे स्मरण होईल, असे चाफेकर म्हणाले.
१९६१ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारे नाटेकर हे पहिले खेळाडू आहेत. एका शालेय पाठ्यपुस्तकात त्यांच्यावर एक धडा होता. आपल्या स्वाक्षरी संग्रहात नाटेकर आणि टी. एन. सेठ या दोघांच्या स्वाक्षऱ्या असल्याबद्दल मी समाधानी असल्याचे ते म्हणाले.
खरेतर, भारतीय बॅडमिंटनमध्ये नाटेकर यांचे योगदान पद्म पुरस्काराहून मोठे आहे, हे आपण यानिमित्ताने लक्षात घेतले पाहिजे. त्यांचे चिरंजीव गौरव नाटेकर हेही उत्तम खेळाडू आहेत. नाटेकर यांना भेटण्याची संधी दोन, तीन वेळा आमच्या लिजेंड्स क्लबमध्ये मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, असेही चाफेकर म्हणाले.
१९६१ ठरले होते लोकप्रिय खेळाडू
नाटेकर आणि सेठ यांच्या खेळात अत्यंत अचूकता आणि परफेक्ट टायमिंग होते. १९६१ मध्ये ते भारतात सर्वांत लोकप्रिय खेळाडू ठरले होते. नाटेकर आणि मीना शहा यांनी मिश्र दुहेरी प्रकारात बँकॉक किंग्ज इंटरनॅशनल स्पर्धा जिंकली होती. त्याच स्पर्धेत नाटेकर हे पुरुष एकेरीतही विजेते ठरले होते. तर १९६५ मध्ये जमेकामध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते, असे चाफेकर यांनी सांगितले.
-----------