कल्याण - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज कल्याणच्या शिवसैनिकांनी भाजपचे शहर कार्यालय तोडल्याच्या निषेधार्थ संतप्त भाजप कार्याकर्त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे ते शिवाजी चौकार्पयत मोर्चा काढला. तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा पोलिसांना दिला आहे.
भाजप कार्यालयाची तोडफोड शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी यांच्यासह आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिवसैनिकांसह केली. यावेळी भाजप कार्यकर्ते प्रसाद टूमकर यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ केली. हा प्रकार कळताच संतप्त भाजप कार्यकर्ते बाजारपेठ पोलिस ठाण्यात जमा झाले. भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्यासह माजी नगरसेविका वैशाली पाटील, महिला आघाडीच्या प्रिया शर्मा आदींनी टूमकर यांच्या मारहाण प्रकरणी आमदारासह साळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांच्या उपस्थितीत शिवसैनिक मारहाण करतात. पोलिस काय झोपले होते का असा संतप्त सवाल केला. यावेळी पोलिसांनी त्यांची मागणी ऐकून घेत टूमकर यांची वैद्यकीय तपासणी करण्यास नेण्याचा प्रयत्न केला. टूमकर यांनी वैद्यकीय तपासणी करण्यास नकार देत सर्व भाजप कार्यकर्ते अॅक्शनचा जबाब रिअॅक्टशने देण्याच्या तयारीत निघाले. बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून पार नाका परिसरातून मोर्चा काढला. भाजप कार्यकत्र्याचा टिळकनगर शिवसेना शाखेवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. मात्र मोर्चा पार नाक्याहून शिवाजी चौकाच्या दिशेने गेला. तेव्हा शिवाजी चौकाती शिवसेना शाखा तोडण्याची कूजबूज भाजप कार्यकर्त्यांमध्ये असल्याने पोलिसांनी शिवाजी चौकात भाजपचा मोर्चा आडविला. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
यावेळी शहराध्यक्ष म्हात्रे यांनी सांगितले की, शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर केलेला हल्ला भ्याड हल्ला आहे. आधी आवाज द्या मग हल्ला करा तेव्हा भाजप कार्यकर्त्यांची काय ताकद हे कळेल. आत्ता भाजप कार्यकर्ते शांत दिसत असले तरी उद्या काय होईल याची जबाबदारी पोलिसांची असेल. तेव्हा भाजपने कायदा हाती घेतला असे बोलू नका. आधी हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करा.