ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याचे पडसाद मंगळवारी ठाण्यातही उमटले. महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत नौपाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांना अटक करण्याची मागणी केली. परंतु, ही घोषणाबाजी सुरू असतानाच महापौरांची जीभ घसरली आणि त्यांनी नारायण राणे अंगार है.. बाकी सब भंगार है, अशी घोषणा केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर भाजपने व्हायरल करून महापौरांनीदेखील राणे यांचे अस्तिव मान्य केले असल्याची टीका केली आहे.
नौपाडा पोलीस ठाण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राणेंविरोधात कोंबडी चोर नारायण राणेला अटक करा, नारायण राणे भंगार है.. शिवसेना अंगार है. अशी घोषणाबाजी केली. या घोषणांनी येथील वातावरण ढवळून निघाले असतानाच अचानक नारायण राणे अंगार है... बाकी सब भंगार है... ची घोषणा कानी पडली. महापौर नरेश म्हस्के यांनी ती दिल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. परंतु, ती दिल्यानंतर शिवसैनिक बुचकळ्यात पडल्याचेही दिसले. त्यामुळे त्यावर नेमके काय बोलायचे, असा पेच काही पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
म्हस्के यांचा अवघ्या पाच सेकंदांचा व्हिडीओ भाजपने विविध सोशल मीडियावर व्हायरल केला. या माध्यमातून महापौरांनीदेखील नारायण राणे अंगार है, हे मान्य केल्याचे भाजपने म्हटले आहे. हा व्हिडीओ महापौरांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी मात्र त्यात छेडखानी झाल्याचे सांगून आंदोलनाचा धसका घेऊन तो खोडसाळपणे तयार करून व्हायरल केल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे आमच्या अंगावर आल्यास आम्हीदेखील जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी शिवसेनेला दिला.