लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्यानंतर मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटले. मंगळवारी काही शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खोपट येथील कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, राबोडी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. शिवसैनिकांना परतविण्यासाठी काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी हातात काठ्या घेऊन कार्यालयाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपायुक्त अंबुरे यांनी या काठ्या ताब्यात घेतल्या.
भाजपचे ठाणे शहर(जिल्हा)प्रमुख आमदार निरंजन डावखरे यांनी संरक्षणाची मागणी करताच पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी तत्काळ या ठिकाणी राज्य राखीव दल पोलिसांची कुमक तैनात केली. भाजप कार्यालयावर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन राबोडी आणि ठाणेनगर पोलिसांनी भाजप कार्यालयावर मंगळवारी सकाळी बंदोबस्त तैनात केला होता. त्याच दरम्यान दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खोपट येथील कार्यालयावर एक दगड आणि शाईचे फुगे तीन ते चार जणांनी फेकले. त्यानंतर या ठिकाणी राजकीय वातावरण चिघळू नये म्हणून त्या परिसरात राज्य राखीव पोलीस दलाच्या एका तुकडीसह स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला. यावेळी उपायुक्त अंबुरे यांच्यासह कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे, राबोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, उपनिरीक्षक महेश जाधव, ठाणेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी आदी अधिकाऱ्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
शिवसैनिकांना रोखण्यात पोलीस यशस्वीnनौपाडा पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर शिवसैनिकांचा जथ्था भाजपच्या कार्यालयाकडे येणार होता. मात्र, सिद्धेश्वर तलावाजवळच शिवसैनिकांना पोलिसांनी रोखले. nतसेच भाजपच्या कार्यालयाकडे येणारी वाहतूक रोखून धरली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, भाजप कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी चौघांना राबोडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नंतर त्यांची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.