लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध केलेले वक्तव्य हे संतापजनक आणि निंदनीय आहे. त्यामुळेच वाद चिघळू न देता राणे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्ता हा संयमी आहे. परंतू, आमच्या अंगावर आल्यास जशास तसे उत्तर देण्याची धमक भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे, असा इशारा भाजपचे आमदार तथा ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिला आहे.केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध केलेले वक्तव्य हे संतापजनक आणि निंदनीय आहे. महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. आतापर्यंत कोणीही मुख्यमंत्र्यांवर असे वक्तव्य केले नव्हते. ते महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारे आहे. कोविड परिस्थिती लक्षात घेऊन वाद चिघळू न देता, राणे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.ठाण्यातील शिवसैनिकांच्या एका टोळक्याने भाजपच्या खोपट कार्यालयावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र,तो यशस्वी झाला नाही. याच पार्श्वभूमीवर डावखरे म्हणाले, भाजचा कार्यकर्ता हा कोणत्याही परिस्थितीमध्ये संयम सोडणार नाही. परंतू, कोणीही कार्यालयावर किंवा कोणाच्याही घरावर जर हल्ला करणार असेल तर तेही खपवून घेतले जाणार नाही. भाजपचा कार्यकर्ता हा कार्यालयाच्या संरक्षणासाठी मागे हटणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी शहर अध्यक्ष अॅड. संदीप लेले, नगरसेवक नारायण पवार, सिताराम राणे आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.