ठाणे: अवनी वाघिणीला पकडण्यात अपयश आल्याने खोट्या चकमकीत तिला ठार मारल्याचा आरोप ठाणे शहर विधानसभा युवक काँग्रेसने केला आहे. गोळ्या घालणार्या त्या वनअधिकार्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रसंगी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी येउर येथील जंगलात जाऊन वाघाचे रक्षण करण्याची शपथ घेतली.यवतमाळमध्ये अवनी वाघिणीला नरभक्षक म्हणून गोळ्या घालून ठार करण्यात आले. या घटनेवरून भाजपा सरकारविरोधात सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. वन्यजीवांचे रक्षण आणि त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून त्याबाबत कठोर कायदे करण्यात आले आहेत. अवनी वाघिणीला पिंजरा लावून किंवा गुंगीचे औषध देऊन तिला पकडता आले असते, मात्र वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्यात कमी पडले. म्हणूनच खोटी चकमक करत तिला गोळ्या झाडून ठार मारले, असा आरोप ठाणे शहर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील भोईर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केला आहे. ठाणे जिल्हाधिकारी, वनसंरक्षक आणि वनमंत्री यांनाही शिष्टमंडळाने निवेदन देत वनकर्मचार्यांची नार्कोे टेस्ट करण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात शहर काँग्रेस सरचिटणीस सचिन शिंदे, महेश पाटील, युवा नेते झिया शेख, आपण सारे संस्थेचे अध्यक्ष राकेश पूर्णेकर, विनित तिवारी, विशाल वाघ, मेहेर चौपाने, अल्ताफ चौधरी, तेजस घोलप, यज्ञेश वाडेकर, तेजस फारूक शेख, विष्णू घाडगे, समीर शेख, बिलाल कुरेशी, तेजस पाटील, जयेश पाटील यांचा समावेश होता. या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत शिष्टमंडळाने वन्यजीवांची हत्या करणार्या भाजपा सरकारचा जाहीर निषेध केला.
अवनीची हत्या करणार्यांची नार्को टेस्ट करा, युवक काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 8:24 PM