ठाणे:
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या हिंदूत्वाच्या विचारांवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना हिंदूत्वाची शक्ती मिळाली. सावरकरांचे हिंदूत्व व भाजपाचे हिंदूत्व यात काहीही फरक नसून, स्वातंत्र्यवीर सावरकरांचेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करीत आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी शनिवारी येथे केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ठाणे शहर भाजपातर्फे गडकरी रंगायतनमध्ये भाजपाचे देवधर यांचे 'सावरकरांचा राजकीय संघर्ष' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, भारत विचार दर्शनचे अध्यक्ष सुश्रुत चितळे, भाजपाचे प्रदेश सचिव संदिप लेले, भाजपाच्या सांस्कृतिक प्रकोष्टचे आकाश राऊत आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
१९४२ मध्ये राजकारणाचे हिंदूकरण झाले पाहिजे. हिंदूंनी राजकीयदृष्ट्या मते दिली पाहिजेत, असा विचार सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मांडला होता. या विचाराला ८० वर्ष पूर्ण झाल्याने, राजकारणाच्या हिंदूकरणाला उत्तर प्रदेशातून खरी सुरूवात झाली. केंद्र सरकारला निर्णय घेताना काही वेळा मर्यादा येतात. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत ३७० कलम हटविता आले नव्हते. आता राम मंदिर, ३७०, सीएए, ट्रिपल तलाक अशी मालिकाच सुरू झाली. मात्र, ती कोविडमुळे थांबली, असेही देवधर म्हणाले.
एक दिवस नक्कीच सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयात सावरकरांचे फोटो लागतील, असा विश्वास देवधर यांनी व्यक्त केला. सावरकरांनी राष्ट्रप्रेम काय असते, ते जगाला दाखवून दिले. त्यांच्या कार्यातून पुढील अनेक दशके तरुण पिढीला प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे यांनी केले. ठाणे व सावरकर यांचे अतूट नाते असल्याचे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले.
`हिंदूत्वाच्या पाठीत शिवसेनेनेच खंजीर खुपसला'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांतून हिंदूंमध्ये जागृती झाली होती, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे. भाजपा कधीही शिवसेनेकडे युतीसाठी गेला नव्हता. शिवसेनेने हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे कार्य केले. शरद पवारांसारख्या व्यक्ती समोरून संघर्ष करतात. परंतु, शिवसेनेने पाठीमागून वार करीत हिंदुत्वाबरोबरच महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे परखड मत देवधर यांनी व्यक्त केले.