राहुल गांधी यांची शिक्षेवरील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्दच राहणार आहे. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. याचबरोबर पटोले यांनी मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.
याचिका फेटाळली असेल तर असुद्या, न्यायव्यवस्थेवर मोदींसरकारचा दबाव आहे, तो यातुन सिद्ध झालेला आहे. यामुळे आम्ही मोदीसरकारच्या विरोधात आंदोलन करू. न्याय व्यवस्थेला आणि सरकारला सांगू की या देशामध्ये सगळ्यांना कायदा समान आहे. मोदी सरकारच्या दबावाखाली येऊन न्याय व्यवस्था अशा पद्धतीच्या कारवाया करत असेल तर काँग्रेस पक्ष लोकशाही पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा पटोले यांनी दिला.
आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, आम्ही आमच्या भुमिकेत स्पष्ट राहू. राहुल गांधी चोर असतील तर त्यांनी ते सिद्ध करावे. ललित मोदी हे देशातील पैसे घेवून पळाले आहेत, त्यांना पकडून का आणत नाही, मोदींचे त्याच्यावर एवढे काय प्रेम आहे. ललित मोदीवर नरेंद्र मोदी चुप का बसतात? का बोलत का नाहीत? अदानी आणि तुमचे नाते काय असे राहुल गांधी मोदींना प्रश्न विचारत होते. नीरव मोदी आणि तुमचे नाते काय की सगळे देशातील लोकांचे पैसे त्यांना लुटायला देत आहात, असा सवाल पटोले यांनी केला.
भीती पोटी राहुल गांधींची खासदारकी रद्द व्हावी म्हणून असा गुन्हा दाखला केला आहे. लोकशाहीला कलंक लावण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत, असा आरोप पटोले यांनी केला.