ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी झालेले लसीकरण आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून समर्पित करीत आहोत, असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. संपूर्ण देशात लसीकरण मोहिम सुरू आहे. जसजसा लसींचा साठा उपलब्ध होतो, त्याप्रमाणे योग्य असे नियोजन करुन महापालिका कार्यक्षेत्रात लसीकरण केले जाते. आजवर लसीकरणाचा ११ लाख ५० हजारांचा टप्पा ठाणे महापालिकेने पूर्ण केलेला आहे. १७ सप्टेंबर रोजी ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेने १९ हजार विक्रमी लसीकरण केले असून हे संपूर्ण लसीकरण हे आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट म्हणून समर्पित करीत आहोत असे महापौरांनी नमूद केले. सोमवारपासून महिलांसाठी दररोज दोन सत्रात लसीकरण केंद्रनोकरीवर जाणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांना लस घेणे गैरसोयीचे होते, परिणामी लसीकरणामध्ये महिलांची संख्या कमी आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी महापौर म्हस्के यांनी महिलांसाठी दोन सत्रात स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत प्रशासनास सूचना केली होती, प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार २० सप्टेंबर पासून ठाण्यातील टेंभीनाका येथील शाळा क्र. ५ आणि १७ मध्ये सकाळी १० ते रात्री १० अशा दोन सत्रात लसीकरण होणार आहे. महिलांनी याचा जास्तीत लाभ घ्यावा असे आवाहन महापौर म्हस्के यांनी केले आहे.
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठाण्याच्या महापौरांची अनोखी भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 8:42 PM