कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपमधून आमदार नरेंद्र पवार यांच्यासह पक्षातील १० जणांनी गुरुवारी मुलाखती दिल्या. पवार यांच्याविरोधात पक्षातील इच्छुकांच्या मागे भाजपचे खासदार कपिल पाटील आहेत. पाटील यांच्या या राजकीय खेळीमुळे पवारांची डोकेदुखी वाढली आहे. पक्षातील या कुरघोडींमुळे भाजपमध्ये सगळे काही आलबेल नाही, हेच स्पष्ट होते.
२०१४ मध्ये भाजपमधून पवार निवडून आले. त्यावेळी शिवसेना-भाजपची युती नव्हती. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युती झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही युती होणार, असा दावा केला जात आहे. भाजपने युतीची वाट न पाहता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. कल्याण पश्चिमेतून विद्यमान आमदार पवार यांना उमेदवारी दिली जाणार, हे निश्चित असले तरी, १० जणांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यात पवार यांच्यासह भाजपचे नगरसेवक संदीप गायकर, नगरसेवक वरुण पाटील, भाजपच्या पदाधिकारी साधना रवी गायकर, नगरसेविका वैशाली पाटील, भाजपचे माजी परिवहन सदस्य महेश जोशी, नगरसेवक अर्जुन भोईर, अर्जुन म्हात्रे, साईनाथ तारे, डॉ. चंद्रशेखर तांबडे इच्छुक आहेत.
साईनाथ तारे हे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण सचिव आहेत. कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदासाठी तारे यांच्या पत्नी शिवसेना नगरसेविका मनीषा तारे या महापौरपदासाठी इच्छुक होत्या. मात्र, पक्षाने त्यांच्या नावाचा विचार केला नाही. त्यामुळे तारे शिवसेनेवर नाराज आहेत. तारे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मागण्याऐवजी भाजपमधून निवडणूक लढवण्यासाठी मुलाखत दिली आहे. याविषयी शिवसेनेनेही तारे यांच्याकडे विचारणा केलेली नाही. तारे यांच्या मुलाखतीचा विषय चांगलाच चर्चेचा ठरला आहे. तारे हे भाजपचे प्राथमिक सदस्य तरी आहेत का, भाजपने त्यांना मुलाखतीची संधी कशी दिली, असे प्रश्नही विचारले जात आहेत.
पवार यांच्याविरोधात नाराजी आहे. त्यामुळे नऊ जणांनी मुलाखती देत उघडपणे ही नाराजी व्यक्त केली आहे. या खेळीमागे खासदार पाटील आहेत. पाटील यांनी ही इच्छुकांची फळी पवारांविरोधात उभी केली आहे. महिनाभरापूर्वी मुरबाड येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात पाटील यांनी भिवंडी व कल्याण पश्चिमेतून आमदारकीची निवडणूक लढवण्याचा उच्चार केला होता. तेव्हा तेथे उपस्थित असलेले शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना-भाजपमध्ये उमेदवारीवरून प्रचंड डोकेदुखी आहे. त्यात असे वक्तव्य करून संभ्रम निर्माण करू नका, असा सल्ला दिला होता.लोकसभा निवडणुकीवेळी युती झाल्याने पाटील यांच्या विजयासाठी सगळ्यांनी काम केले. त्यात पवार यांचाही वाटा आहे. कल्याण पश्चिमेतून पाटील यांचे मताधिक्य वाढले आहे. दरम्यान, सध्याच्या राजकीय खेळीबाबत पवार यांनी पाटील आपल्यासोबत असल्याचे सांगून पाटील यांचा डाव त्यांच्याच गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला आहे.मी शिवसेना सोडलेली नाही : तारेसाईनाथ तारे म्हणाले की, मी शिवसेना सोडलेली नाही. तसेच मी भाजपचे सदस्यत्वही घेतलेले नाही. पालघर लोकसभा मतदारसंघातून युतीसाठी भाजपचे राजेंद्र गावित शिवसेनेचे शिवबंधन हातावर बांधू शकतात. मग मी का भाजपतर्फे निवडणूक लढवू शकत नाही? राज्यात युती असून उमेदवार म्हणून मी इच्छा दर्शवली आहे. त्यासाठी भाजपतर्फे मुलाखत दिली आहे. माझी पत्नी मनीषा हिला महापौरपद न मिळाल्याने नाराज नाही. तेव्हा माजी महापौरांनी अपशब्द वापरल्याने आम्ही नाराज झालो होतो. त्यासाठी नगरसेविकापदाचा राजीनामा देण्याचे स्पष्ट केले होते. मी शिवसेनेच्या संपर्कात नाही, असे विधान कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केले असले तरी, ते तरी माझ्या कुठे संपर्कात आहेत? माझे कार्यक्षेत्र व कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भिवंडी लोकसभेच्या अंतर्गत येतो. माझे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आहे.