ठाणे : ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी अपेक्षेप्रमाणे अखेर नरेश म्हस्के यांनी, तर उपमहापौरपदासाठी आयत्यावेळी पल्लवी कदम यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज भरले. राष्ट्रवादीला माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नव्या समीकरणाची आठवण करून देत उमेदवारी अर्ज दाखल न करण्याची विनंती केली. तर, भाजपने अर्जच भरला नाही. यामुळे आता म्हस्के यांच्या निवडीची केवळ औपचारिकताच शिल्लक आहे. दुसरीकडे देवराम भोईर कुटुंबीयांनी जाहीर नाराजी व्यक्त करून दोन वर्षांनंतर बघा, असे सांगून शिवसेनेच्या नेत्यांना बंडाचा इशारा दिला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होत असली, तरी शिवसेनेतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसले.आरक्षण सोडतीत महापौरपद सर्वांसाठी खुले झाल्याने त्यासाठी अनेक जण इच्छुक होते. यामध्ये सुरु वातीपासूनच नरेश म्हस्के यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेल्या देवराम भोईर यांनादेखील महापौरपदाची कमिटमेंट दिली गेली होती. त्यामुळे तेदेखील या पदासाठी इच्छुक होते. परंतु, शनिवारी केवळ म्हस्के यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमहापौरपदासाठी नगरसेवक उमेश पाटील तसेच सुधीर कोकाटे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, या दोघांनीही नकार दिला होता. त्यामुळे नगरसेविका पल्लवी कदम यांच्या गळ्यात हे उपमहापौरपद टाकण्यात आले. म्हस्के यांच्या रूपाने पहिल्यांदाच ठाणे पूर्व भागाला महापौरपदाची संधी मिळाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संधी दिल्याने त्यांना महापौरपद देण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरूहोती.म्हस्के यांच्या भूमिकेकडे लक्षविद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांची कारकीर्द गाजली, ती आयुक्त आणि त्यांच्यातील संघर्षामुळे. अनेकवेळा नरेश म्हस्के यांच्यावरच या संघर्षातून मार्ग काढण्याची वेळ आली होती. यामुळे त्यांना सर्वपक्षीय मित्र मानले जात असून वेळप्रसंगी त्यांनी प्रशासनाची बाजूदेखील सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता ते स्वत: महापौर असल्याने ते प्रशासनासंदर्भात कारभार चालवताना काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मागील २५ वर्षे ठाणेकरांनी शिवसेनेवर जो विश्वास दाखविला आहे, तो आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करणार आहे. नगरसेवकांच्या अधिकारावर गदा येऊ देणार नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे एकमेकांच्या हातात हात घालून काम करुन विकासावर भर देणार.- नरेश म्हस्केएकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर राष्ट्रवादीची माघारमहापौरपदाची निवडणूक ही बिनविरोध होणार हे जवळजवळ निश्चित होते. परंतु, राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची समीकरणे निश्चित होत नसल्याने व आपले अस्तित्व टिकविण्यासाठी राष्ट्रवादीने अचानकपणे ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शनिवारी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या केबिनमध्ये त्यांची बैठक सुरूहोती. त्याचवेळेस एकनाथ शिंदे यांनी त्याठिकाणी हजेरी लावून राज्यात आपल्या तीनही पक्षांची समीकरणे जुळत आहेत, त्यामुळे तुम्ही ठाण्याची निवडणूक बिनविरोध करा, असे आवाहन करून अर्ज दाखल न करण्याची विनंती केली. त्यानुसार, त्यांच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रवादीने या निवडणुकीतून माघार घेतली.समजुतीनंतरही संजय भोईर नाराजशनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेस माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आदींसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संजय भोईर यांनीदेखील हजेरी लावून आपली नाराजी जाहीर व्यक्त केली.यावेळी खासदार राजन विचारे आणि आमदार सरनाईक यांनी महापालिका मुख्यालयातील लॉनवरच त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. एक वर्ष तुम्हाला महापौरपद मिळेल, असेही भोईर यांना सांगण्यात आले. मात्र, तरीही त्यांची नाराजी दूर झाली नाही.त्यानंतर, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नरेश म्हस्के यांच्या केबिनमध्ये त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना स्थायी समितीचेही आश्वासन देण्यात आले. मात्र, आता वेळ निघून गेली असल्याचे सांगून त्यांनी या बैठकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होत असली, तरी भोईर यांच्या नाराजीमुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला.
ठाण्याच्या महापौरपदी नरेश म्हस्के; उपमहापौरपदी पल्लवी कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:49 AM