उल्हासनगर : जेमतेम २२ दिवसांच्या बाळाची विक्री करणाऱ्या डॉ. चित्रा चैनानी यांच्या महालक्ष्मी नर्सिंग होमची नोंदणी रद्द झाली असतानाही हे नर्सिंग होम सुरू होते, अशी धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे. डॉ. चैनानी हिच्यावर बाळ विक्रीचा यापूर्वीही गुन्हा दाखल आहे. बाळ विक्रीचे हे रॅकेट उल्हासनगर, नाशिक ते कर्नाटकातील बेळगावपर्यंत आहे.बाळाची विक्री केल्याबद्दल पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. चैनानी, त्यांच्या सहकारी प्रतिभा, नाशिकच्या संगीता वाघ, बेळगाव कर्नाटकचा देवाण्णा कमरेकर व बाळाची आई गंगादेवी योगी यांना न्यायालयाने २२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. उल्हासनगर कॅम्प नं. ३ येथील महालक्ष्मी नर्सिंग होममध्ये मुलाची विक्री होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ठाणे क्राइम ब्रँचला दिली होती. त्यानंतर बनावट ग्राहक पाठवून बाळ विक्रीचा पर्दाफाश झाला. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता सपकाळे यांनी सांगितले की, महालक्ष्मी नर्सिंग होमचे रजिस्ट्रेशन अनेक वर्षांपूर्वी रद्द केल्याची नोंद महापालिका आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे.
‘लोकमत’ने उपस्थित केलेले प्रश्न- डॉ. सपकाळे यांच्या दाव्यानुसार नर्सिंग होमचे रजिस्ट्रेशन रद्द असताना नर्सिंग होम कसे सुरू होते?- महापालिका आरोग्य विभाग शहरातील क्लिनिकला भेटी देऊन तपासणी करीत नाही का?- आरोग्य विभागाच्या संगनमताने हे क्लिनिक सुरू होते का?- महालक्ष्मी नर्सिंग होमवर आरोग्य विभागाने कारवाई का केली नाही?
दोषींवर कारवाईची मागणीसंबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यापूर्वीही डॉ. चैनानी हिच्यावर बाळ विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे बोलले जात आहे. डॉ. चैनानी हिच्या पदवीची चौकशी पोलिस करीत असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी मधुकर कड यांनी दिली.
असा आहे घटनाक्रम नर्सिंग होमच्या डॉ. चित्रा चैनानी यांची नाशिकमधील दलाल संगीता वाघ हिने बाळाची आई गंगादेवी योगी हिची ओळख करून दिली. बेळगाव येथील दलाल देवाण्णा याचाही बाळ विक्रीच्या रॅकेटमध्ये सहभाग आहे. राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमधील गोरगरीब, गरोदर महिलांना हेरून त्यांना त्यांची मुले विकण्याकरिता मोठ्या रकमेचे आमिष दाखवले जाते. न्यायालयाने आरोपींना २३ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.