डोंबिवली: दस-यानिमित्त डोंबिवलीतील बाजारपेठेमध्ये शनिवारी सकाळच्या वेळेत व्यावसायिकांमध्ये उत्साह असला तरीही ग्राहकांनी मात्र बाजाराकडे पाठ फिरवली. आठवडाभरापासून सुरु असलेल्या नवरात्रौत्सवामुळे फुल बाजारात तेजी होती. बाजीप्रभु चौकातील छोट्या व्यावसायिकांमध्ये दस-यानिमित्त तर भाजीबाजारात गर्दी झाल्याने त्या विक्रेत्यांमध्ये समाधान होते. पण मोठ्या व्यावसायिकांमध्ये मात्र नाराजी होती.
भाज्यांचे भाव कडाडलेले असतांनाही नऊ दिवसांचे उपास सुटणार असल्याने फळभाज्यांना जास्त मागणी होती. सकाळी ११ पर्यंत बाजारात गर्दी दिसून आली, पण संध्याकाळी फारशी गर्दी नव्हती. बाजारपेठेतील प्रमुख सराफांकडे चौकशी करणारा ग्राहक वर्गाची गर्दी होती, पण नोटबंदी आणि महागाईमुळे खरेदीकरण्याकडे ग्राहकांचा कल नसल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. महिन्याचा अखेरचा दिवस असून तीन दिवसांच्या सलग सुटीमुळे अपेक्षित उलाढाल झाली नसल्याचे सांगण्यात आले. पारंपारिक पद्धतीने झेंडुचे तोरण आणि फुलांना मागणी होती, पण दुपारनंतर झेंडुचा भाव गडगडला. सकाळी ३० रुपये पावकिलो असणारा झेंडु संध्याकाळी २० रुपयांवर विकला गेला.
* देवींचे विसर्जन : दस-यानिमित्त पश्चिमेकडील रेती भवन परिसरातील देवीचे पारंपारिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. त्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. पूर्वेलाही गांधीनगर, मानपाडा रोड, गोग्रासवाडी, एमआयडीसी परिसरातील देवीचे मिरवणुक काढुन ठिकठिकाण विसर्जन करण्यात आले. एल्फीस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेमुळे कुठेही फारसा गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने मिरवणुका काढल्या गेल्याचे पोलीसांनी सांगितले.
* रा.स्व.संघाच्या वतीने बाजीप्रभू नगर, लोकमान्य नगर, समर्थ नगर, एकलव्य नगर, दीनदयाळ नगर, नेताजी सुभाष नगर आदी ठिकाणी डोंबिवलीत विजयादशमीनिमित्त पथसंचालन करण्यात आले. कोकण प्रांताचे प्रचारप्रमुख प्रमोद बापट यांनी केलेल्या आवाहनानूसार अत्यंत साधेपणाने संचालन काढण्यात आले होते. काही ठिकाणी रविवारी उत्सव-बौद्धिक संपन्न झाले तर काही नगरांमध्ये रविवारी उत्सव करण्यात येणार आहेत. शनिवारी समर्थ नगराचे शास्त्री हॉल येथे उत्सव झाला. दीनदयाळ नगराचा स्वामी विवेकानंद शाळेच्या राणाप्रताप भवन येथिल शाळेत, आणि भागशाळा मैदानात, लोकमान्य नगरचा अयोध्या नगरी मैदानानजीक शांतीनगर शाळेत उत्सव घेण्यात आला.* रविवारी होणा-या संघाच्या उत्सवांमध्ये बाजीप्रभू नगरचा उत्सव जोशी हायस्कूल मैदानात संध्याकाळी ६ वाजता, मानपाडेश्वरचा सर्वोदय स्कूल निळजे, आणि हनुमान नगरमधील एकता मित्र मंडळ, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ५.३० वाजता होणार आहे.