- प्रशांत माने, कल्याण कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या काही शाळांचा दर्जा एकीकडे खालावला असताना जरीमरी शाळेप्रमाणे येथील पूर्वेकडील प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक विद्यालयानेदेखील गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जा उत्तम राखला आहे. विशेष बाब म्हणजे शिष्यवृत्ती पटकावण्याची परंपरा येथील विद्यार्थ्यांनी यंदाही कायम ठेवली असून मराठीप्रमाणे इंग्रजीचे धडे गिरविणारी ही शाळा एक ‘रोल मॉडेल’ ठरली आहे.नेतिवली परिसरात ही शाळा असून या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवीचे मराठी माध्यमाचे तर शिशुवर्ग ते सहावीपर्यंतचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग भरतात. या ठिकाणी विद्यार्थी पटसंख्या ७०९ इतकी असून बालवाडीत ५० मुले शिकतात. बालवाडीत याआधी केवळ २० ते २२ विद्यार्थी असायचे. परंतु, आता तेथील पटही सुधारला आहे. मराठी माध्यमासाठी मुख्याध्यापकासह २० शिक्षक तर इंग्रजीसाठी ७ शिक्षक आहेत. इंग्रजी माध्यमाची पालिकेची ही एकमेव शाळा आहे. या शाळेत सर्व सुविधाही उपलब्ध आहेत.-शालेय पोषण आहार नियमितपणे मिळत असून पाठ्यपुस्तकांप्रमाणे आता वह्या, रेनकोट, दप्तरे आदी शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत. येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पटकाविण्याची परंपरा कायम ठेवली आहे. -तालुका आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये येथील विद्यार्थी विशेष यश संपादन करीत असून शाळा कशी असावी, याचा आदर्श परिपाठ ही शाळा ठरली आहे. असे असले तरी शाळेत उपलब्ध करून देण्यात आलेले पाच संगणक बंद असून विद्यार्थी संगणकीय ज्ञानापासून वंचित, तर सफाई कर्मचाऱ्याचीही वानवा आहे.
नेतिवलीची शाळा ठरते आहे रोल मॉडेल
By admin | Published: July 30, 2015 11:26 PM