- स्नेहा पावसकरठाणे : पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आणि अगदी दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारा गणित हा विषय आजही विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात भीती निर्माण करतो. मात्र, प्राथमिक वर्गातच मुलांना गणिताबद्दल आवड निर्माण व्हावी आणि त्या मुलांना गणित शिकवणाऱ्या शिक्षकांनाही गणित अध्यापन सोपे आणि आनंददायी वाटावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने गणितमित्र संतोष सोनवणे गेली तीन वर्षे विशेष प्रयत्न करत आहे.विविध कार्यशाळांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षकांना गणित सोपे करून सांगण्याचा त्यांनी जणू पवित्राच घेतला आहे. गणित हा एक अमूर्त विषय आहे. त्यामुळे तो शाळेत विद्यार्थ्यांना दृश्य स्वरूपात पाहून शिकता आला, तर तितके लवकर आकलन होते. हे लक्षात घेत सोनवणे यांनी गणितातील विविध संबोध आणि संकल्पना यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने अध्यापन करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणाचे मोड्युल तयार केले. गेल्या दोनतीन वर्षांत सोनवणे यांनी ठाणेमुंबईसह पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्याही या प्रत्येक विषयाशी निगडित साधारण ५०-६० कार्यशाळा घेतल्या आहेत.ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले आणि सध्या प्रतिनियुक्तीवर प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई येथे गणित विषय सहायक म्हणून काम पाहणारे ठाणेकर संतोष सोनवणे यांनी गणित विषयासंदर्भात हाती घेतलेले कार्य शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरते आहे.भागाकार संकल्पनेवर आधारित प्रशिक्षण संच व शिक्षक हस्तपुस्तिका सोनवणे यांनी तयार केली. अपूर्णांकाची संकल्पना सोपी करून सांगण्यासाठी त्यांनी त्याचे अर्थ, साहित्यानुसार मांडणी, मुलांसोबत प्रात्यक्षिक, फलकलेखन हे सर्व त्यांनी कार्यशाळेद्वारे उलगडले आहे. गणितामधील रीतीची समज, संबोध, संकल्पना, तर्काची समज विकसित करणारी रंजकपद्धती प्रत्यक्ष खेळाद्वारे कृती ‘गणित समजून घेताना...’ सोनवणी यांनी कार्यशाळेतून मांडली.
राष्ट्रीय गणित दिन विशेष : गणित सोपे करण्यासाठी गणितमित्राची धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 2:56 AM