- जितेंद्र कालेकर
ठाणे - महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने येत्या ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी 'राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा' या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यासह कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी दिली.
आजवरच्या २३ वर्षाच्या प्रवासातील साडेसतरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या सत्तेमध्ये राहिला. शरद पवार यांनी सातत्याने केलेली विचारांची पेरणी आणि दुस-या फळीतील नेत्यांनी केलेली मशागत यामुळे प्रत्येक आघाडीवर पक्षाने अग्रभागी राहून आपली भूमिका बजावली. समविचारी पक्षांना सोबत घेऊन वैचारिक लढाई लढली. हीच परंपरा अधिक व्यापक आणि गतिमान करण्यासाठी शिर्डी येथे या अभ्यास शिबिराचे आयोजन केले आहे.
केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना दहशतीखाली ठेवण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने अडीच वर्षे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले. केंद्रीय यंत्रणांची दहशत वापरुनच फोडाफोडी करून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यात आले. केंद्रातील सत्ताधार्यांच्या कारभारामुळे देशापुढे अनेक प्रश्न गंभीर स्वरुपात उभे राहिले आहेत. समाजामध्ये फूट पाडण्याचे तसेच विद्वेष निर्माण करण्याचे काम सत्तेच्या माध्यमातून केले जात आहे. घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण करण्याची मोहीम राबवली जात आहे. लोकशाही पद्धतीने आवाज उठवणाऱ्या विद्याथ्यापार्सून अभ्यासकांपर्यंतच्या विविध घटकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी सुरु आहे. अनेक पातळ्यांवरचे अपयश लपवण्यासाठी धार्मिक मुद्यांच्या आड लपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांसंदभार्तील नेमके वास्तव काय आहे, त्यासंदभार्तील नेमकी आव्हाने कोणती आहेत आणि त्यांना सामोरे कसे जाता येईल यासंदभार्तील मंथन शिबिरामध्ये करण्यात येणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचाह्ण या शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक,कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकार आदी महनिय व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.