ठाणे : ठाण्यात सध्या दोन प्रभाग काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. कळव्यातील खारीगाव भागात, राष्ट्रवादीच्या उमेदवाला पक्षाचा एबी फॉर्म दिला असताना पक्षाकडून अपक्षाचा प्रचार सुरू झाला आहे. दुसरीकडे रिपाइंने भाजपाने बरोबर असलेली युती तोडली असतानाही पक्षाने आता भाजपाबरोबर घरोबा केल्याचे समोर आले आहे. यामुळे वागळे पट्ट्यातील रिपाइंच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की, आपल्या उमेदवाराला असा पेच सध्या भाजपा कार्यकर्त्यांना पडला आहे. कळवा भागातील खारीगाव भागात प्रभाग क्र. २४ मध्ये सध्या प्रचाराच्या मुद्यावरून रान पेटले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या तिकिटावर अक्षय ठाकूर हे निवडणूक लढवत आहेत. परंतु, ते गणेश नाईक यांचे समर्थक मानले जातात. तर, आव्हाड समर्थक असलेले जितेंद्र पाटील हेदेखील आपले नशीब आजमावत आहेत. ते अपक्ष उभे आहेत. परंतु, आता राष्ट्रवादीकडून येथे जितेंद्र पाटील यांचा प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या प्रभागात या दोघांशिवाय, सेनेचे सचिन म्हात्रे, भाजपाचे लक्ष्मीकांत यादव हेदेखील रिंगणात आहेत. त्यातही हा वॉर्ड राष्ट्रवादीचा मानला जातो. परंतु, आता पक्षाच्या दोघांतच येथे लढाई सुरू झाल्याने त्याचा फायदा आता सेना अथवा भाजपाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर, वागळे इस्टेटमधील १७ ड मधील रिपाइंचे उमेदवार रामभाऊ तायडे यांच्यासाठी आता भाजपाने लाल गालिचा अंथरल्याचे दिसत आहे. शनिवारच्या भाजपाच्या सभेत अचानक रिपाइंचे अध्यक्ष तायडे यांनी व्यासपीठावरून भाषण सुरू केले. त्यामुळे भाजपा आपल्या उमेदवाराला पाठिंबा देणार की रिपाइंला, हे पाहणे महत्त्वाचे आहे. येथे भाजपाने हेमंत सांबरे यांना उमेदवारी दिली आहे. तर, सेनेचे योगेश जाणकर हेदेखील या लढतीमध्ये आहेत. परंतु, सांबरे हे घाडीगावकर यांचे निकटवर्ती मानले जात असून त्यांनी ऐन तिकीटवाटपाच्या काळात केलेल्या गोंधळामुळे भाजपातील काही मंडळी त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रभागातही चांगलाच गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
खारीगावात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी
By admin | Published: February 14, 2017 2:52 AM