नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील विविध मुख्य व अंतर्गत रस्ते नादुरुस्त असून पावसामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. पालिका आयुक्तांनी कोट्यवधी रुपये खर्च करून गणेशोत्सव दरम्यान केलेली रस्ते दुरुस्ती ही कागदावर असून प्रत्यक्षात त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
आयुक्तांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून पालिका प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्त करावेत त्याचबरोबर शहरातील चाविंद्रा नागांव रामनगर येथील नागरी वस्तीत असलेले कचरा डंपिंग ग्राउंड तातडीने बंद करावे अशा विविध मागण्यांसाठी आज पालिका मुख्यालया समोर भिवंडीराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट सेवादल अध्यक्ष देवानंद गौड यांच्या नेतृत्वा खाली एक दिवसीय उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आयुक्त हटाव भिवंडी बचाव अशा घोषणाही आंदोलनकर्त्यांनी दिल्या.या आंदोलनात पक्षाचे राज्य पदाधिकरी राजेश चव्हाण, अनिल फडतरे,संतोष राय,कैलास घरत, इरशाद अंसारी यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
पालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेला शहर विकास आराखड्यात अनेक त्रुटी असून त्याचे पुनर्विलोकन करण्यात यावे. भिंवडी शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी व अपघात होत आहे. त्यामुळे तातडीने रस्ते दुरूस्त करण्यात यावी. पालिकेच्या धोकादायक शाळा इमारतींची तातडीने दुरूस्ती करावी व शहरात पालिका प्रशासनाच्या सहकार्याने सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पुर्णपणे बंद करून शहरात वाहन तळ निर्माण करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्त अजय वैद्य यांना लेखी स्वरूपात देण्यात आले आहे.