कल्याण : जुना मुंबई-पुणे महामार्गावरील नैसर्गिक नाले पुनरुज्जीवित केल्यानंतर आता कल्याण-शीळ रोडवरील नालेही पुनरुज्जीवित होणार आहेत. मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी एमएसआरडीसी, केडीएमसी अधिकाऱ्यांसह पाहणी केली आहे. त्यामुळे आता पावसाळ्यात कल्याण-शीळ रोडवर साचणाऱ्या पाण्यामुळे वाहनचालकांना होणारा मनस्ताप कमी होणार आहे.
कल्याण-शीळ रस्त्याच्या डीपीआरमध्ये नाल्यांचा समावेश नव्हता. त्यामुळे नाल्यांचे पाणी रस्त्यावर तुंबण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे यासंदर्भात पाटील यांनी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला. यानंतर एमएसआरडीसीने नाल्यांसाठी निधी मिळावा, यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. बंद झालेले नैसर्गिक नाले पुनरुज्जीवित केल्यास नाल्यांमधील पाण्याचा निचरा होईल. तसेच अनेक नाल्यांवरील अतिक्रमण तोडून नाला पुनरुज्जीवित करण्याचे पाटील यांचे लक्ष्य आहे.
पाटील यांनी एमएसआरडीसीचे वरिष्ठ अभियंता नागपाल, उपअभियंता बोरडे, केडीएमसीचे ई वॉर्ड अधिकारी राजेश वसईकर, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल चौधरी यांच्यासह पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक बाबाजी पाटील, मनसेचे डोंबिवली शहर संघटक तकदीर काळण, योगेश पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
बेकायदा बांधकामांवर कारवाई कधी?
निळजे, लोढा हेवन, काटई, कासारिओ पलावा सिटी आणि शीळ फाटा येथे जाणारी वाहने पलावा चौकातून जातात. मात्र, या चौकातील बेकायदा बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. तसेच अपघातालाही निमंत्रण मिळते. दुसरीकडे पलावा जंक्शन परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे; परंतु त्याआड येणारी धोकादायक बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी महापालिका चालढकल करत आहे. तसे न करता, ही बांधकामे तातडीने तोडावीत, अशी मागणीही वाहनचालक करत आहेत.