- सुरेश लोखंडे
ठाणे : राज्य घटनेने नेमुन दिलेल्या संविधानात निसर्ग संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य दिले आहे. प्राणी क्षेत्रात काम करायला धैर्य लागते. त्यातही अपंग प्राण्यांसाठी काम करणे अधीक त्रासदायक आहे. त्यामुळे 'पाणवठा' या संस्थेचे कार्य खरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी कल्याण तालुक्यातील डोंबिवलीच्या खोणी येथील कार्यक्रमात काढले. यावेळी अनेक प्राण्यांबाबत याचिकांवर दिलेल्या निकालांचा उल्लेखही यावेळी केला.
डोंबिवलीच्या खोणी येथील 'घरकुल' संस्थेमार्फत रविवारी पाणवठा' या संस्थेच्या परिवारातील २५ स्वयंसेवकांचा सत्कार न्या. ओक यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी राज्य घटनेने नेमुन दिलेल्या संविधानात निसर्ग संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी 'पाणवठा' या मुक्या प्राण्यांची सेवा करणार्या संस्थेचे प्रा. गणराज जैन आणि डाॅ. अर्चना जैन यांच्यासह २५ स्वयंसेवकांचा गौरव करून त्यांना सौर कंदील, सन्मानचिन्ह दिले आणि पाणवठाचे कार्य खरच कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाला कल्याणच्या तहसिलदार सुषमा बांगर, स्पेशल मुलांच्या 'घरकुल' आश्रमच्या अमेय पालक संघटनेचे अविनाश बर्वे आदी उपस्थित होते. बदलापूर आणि वांगणी दरम्यान चामकोली गावालगत जैन यांचे मुक्या प्राण्यांसाठी पाणवठा संस्थेचा पाण्याचा आश्रम आहे. सध्या या आश्रमात ११० मोकाट,बेवारस प्राण्यांवर उपचार सुरू आहेत. अपंग प्राण्यांचा अनाथाश्रमात कायमस्वरुपी अपंग झालेल्या प्राण्यांचे संगोपन केले जाते. या अपंग प्राण्यांची माऊली डाॅ. अर्चना जैन व त्यांचे पती गणराज जैन या अनोख्या दांपत्याने पाणवठा या अंपग प्राण्यांच्या आश्रमाची स्थापना केली. हे दांपत्य गेली अनेक वर्षे प्राणी क्षेत्रात कार्यरत आहे. हजारो प्राण्यांना नवे सुखकर आयुष्य देण्यात त्यांना यश मिळाले आहे.
आश्रमाची सर्वात अधोरेखीत करण्यासारखी बाब आहे स्वच्छता. शंभरहून अधीक अपंग, अंध प्राणी आजही आश्रमात दाखल आहेत. परंतु तरीही साधारणपणे प्राण्यांच्या शेल्टर्समधे जाणवणारा कोणताही वास येथे जाणवत नाही. पिल्लांचा निट-नेटका सांभाळ, स्वतःचे विज कनेक्शन नसुनही प्रत्येक पिजर्यात असलेली लाईट व्यवस्था, प्रत्येक पिल्लांचे बेड, एसटीएस म्युजीक थेरपी, प्राण्यांची मानसीक व शारीरीक दृष्ट्या घेतली जाणारी काळजी आदी या सर्व बाबी देखील पाणवठा आश्रमाचे वेगळेपण दर्शवते. हे दाम्पत्य गेली १७ वर्षे प्राणी क्षेत्रात कार्यरत असून पाणवठा हा भारतातील पहिला अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम त्यांनी स्थापन केला आहे. गेली १० वर्षे सफर नावाचे जखमी प्राण्यांचे मोफत उपचार केंद्र चालवले आहे. आजपर्यंत ४५०० पेक्षा अधिक प्राण्यांवर या केंद्रात मोफत उपचार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या आश्रमात पोपट, माकड, खवले मांजर, निलगाय, सांबर, भेकर तसेच विविध पक्षी इत्यादींचा समावेश आहे. त्याचबरोबर 'सावली गोशाळा' या त्यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून १५० पेक्षा जास्त गाई त्यांनी गरजू शेतकर्यांना मोफत दिल्या आहेत.